अमळनेर : आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून दोघांनी एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना ८ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास निंभोरा अमळगाव रस्त्यावर घडली.
अश्विनी पाटील या मुलीने गावातीलच खुशाल राजेंद्र पारधी याच्याशी प्रेमसंबंध असल्याने न्यायालयात नोंदणीकृत विवाह केला आहे. दोन दिवसांपूर्वी निखिल शेखर पाटील (रा. अमळगाव) याने निंभोरा येथे जाऊन अश्विनीच्या घरासमोर जाऊन तू आदिवासी जातीच्या तरुणाबरोबर विवाह का केला, असे बोलून तुझ्या नवऱ्याला जीवे मारून टाकू, अशी धमकी देऊन निघून गेला. ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अश्विनीचा पती खुशाल पारधी अमळगावकडे जाण्यास निघाला असता, निखिल शेखर पाटील व हेमंत शेखर पाटील हे अमळगावकडून मोटारसायकलवरून येऊन खुशालला अडवले आणि हेमंतने त्याला धरून ठेवून निखिलने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने खुशालच्या डोक्यावर मारून रक्तबंबाळ करून पळून गेले.
गावातील गणेश पारधी, सागर पारधी, हरीश पारधी, संदीप पारधी यांनी खुशालला मोटारसायकलवरून अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून खुशालची प्रकृती गंभीर असल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेने धुळे येथे रवाना केले. अश्विनीच्या फिर्यादीवरून निखिल व हेमंत विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील करीत आहेत.