शासकीय योजनेत ४७ लाखांचा अपहार : न्यायालयात जोरदार युक्तिवाद
जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान या योजनेत ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या निमजाई फाऊंडेशनचा समन्वयक दीपक नीळकंठ जावळे (वय २७, रा. नितीन साहित्या नगर, सुप्रीम कॉलनी) याला न्यायालयाने बुधवार(दि. २८ मे)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, तपासाधिकारी संदीप पाटील यांनी स्वत:च युक्तिवाद करून गुन्ह्याचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजक विकास अभियान अंतर्गत शैक्षणिक संस्था सुरू करून देण्यासाठी भूषण गणेश बक्षे (वय २७, रा. पार्वती काळे नगर, मोहाडी रोड, जळगाव) याने भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्या मयूरेश्वर स्कूल ऑफ काॅम्प्युटर एज्युकेशन या प्रशिक्षण केंद्राच्या अनुदानाची रक्कम खोटे ठराव व खोट्या सह्या करून परस्पर काढून घेऊन ४७ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी निमजाई फाऊंडेशनचे भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील, भरत अरविंद भंगाळे, मोहिनी भरत भंगाळे, राजेंद्र नरेंद्र नारखेडे व भगवान दगडू पाटील या सहाजणांविरुद्ध १ फेब्रुवारी २०१९ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. भूषण बक्षे व शीतल पाटील यांना यापूर्वीच अटक झालेली आहे, तर उर्वरित चारजणांना औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
हा गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. संस्थेचा समन्वयक दीपक नीळकंठ जावळे हा फरार होता. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी त्याला बुधवारी न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.