लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील सत्ताधारी भाजपविरोधात बंड पुकारलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी सोमवारी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. या पक्षप्रवेशावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत व रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर आदी उपस्थित होते.
महापौर व उपमहापौरपदासाठीची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर असताना सत्ताधारी भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे. २७ नगरसेवक रविवारी मुंबईला रवाना झाले होते. त्यापैकी नऊ नगरसेवकांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच शिवबंधन घालून नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन देशमुख, सुधीर पाटील, कुंदन काळे, भरत कोळी, किशोर बाविस्कर यांचा समावेश आहे. इतर नगरसेवकांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला, तरी ३० नगरसेवक आमच्यासोबत असल्याचा दावा कुलभूषण पाटील यांनी केला आहे.
आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नव्हती
कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत यांनी ‘लोकमत’कडे आपली भूमिका जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आमदार गिरीश महाजन व सुरेश भोळे यांच्याकडे अमृतयोजना व वॉटरग्रेसच्या गैरकारभाराबाबत अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, आमच्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे नगरसेवकांनी सांगितले. तसेच अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्हाला दूर ठेवण्यात येत असल्याचाही आरोप नगरसेवकांनी केला आहे.
कापसे यांच्या नावाला विरोध नव्हता, सुरेश सोनवणेंना मात्र विरोध
१. कुलभूषण पाटील यांनी सांगितले की, महापौरपदावरून पक्षाने दिलेल्या कोणत्याही नावाला आमचा विरोध नव्हता. प्रतिभा कापसे, भारती सोनवणे यांचे नाव महापौरपदासाठी आले असते, तरी आमचा पाठिंबा होता. मात्र, आमदार भोळे यांनी महापौरपदाच्या उमेदवाराबाबत आमच्याशी चर्चा केली नाही.
२. तसेच आमदार भोळे यांनी सुरेश सोनवणे यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर केले होते. सुरेश सोनवणे यांच्या नावाला आमचा विरोध असतानाही आमदार भोळे हे सुरेश सोनवणे यांच्या नावावरच ठाम होते. यामुळे आमची नाराजी वाढत गेली. पक्षाने आमची बाजू ऐकून घेतली नसल्याचाही आरोप कुलभूषण पाटील यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी दिले जळगावच्या विकासाचे आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जळगाव शहराच्या विकासाची हमी नगरसेवकांना दिली असल्याची माहिती नगरसेवकांनी ‘लोकमत’ला दिली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील जळगाव महापालिकेला निधीची कमतरता पडू देणार नसल्याची हमी देत शहरातील प्रमुख समस्या लवकरच सोडविल्या जाणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
स्वयंस्फूर्तीने सेनेत जाण्याचा निर्णय, कोणत्याही नेत्याचे प्रयत्न नाहीत
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नऊ नगरसेवकांनी घेतलेला निर्णय हा स्वयंस्फूर्तीने घेतलेला असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने सेनेत येण्याचे निमंत्रण दिले नव्हते. मात्र, पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रावेरचे संपर्कप्रमुख विलास पारकर व खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्कात होतो. त्यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतरच आम्ही आमचा निर्णय घेतल्याचे सांगितले.