पहूर ता जामनेर: भराडी ता जामनेर येथील चौधरी परिवाराने आपल्या उच्च शिक्षणाने आपली छाप पाडली असून या परिवारातील ९ जण विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. याच परीवारातील स्नुषा नायब तहसीलदार झाली आहे. काबाडकष्ट करुन चौघा भावांनी एकत्र राहत ही प्रगती साधल्याने या परीवाराचा आदर्श समाजासमोर निर्माण झाला आहे.भराडी येथील रहिवासी मधूकर रामकृष्ण चौधरी ,शंकर चौधरी, रमेश चौधरी व अशोक चौधरी या चार भावडांचा परिवार आहे. कुटुंब प्रमुख म्हणून शंकर चौधरी यांनी जबाबदारी हातात ठेवली आणि आपल्या भावंडाशी सुसंवाद साधून तब्बल पन्नास वर्षे हा परीवार एकत्रित राहिला. सहा महिन्यांपूर्वीपासून चौधरी कुटुंब नाममात्र विभक्त आहे. विशेष म्हणजे या परिवारात सर्व भावंडे ही मुलांचे शिक्षण व विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहे. यादरम्यान किराणा व शेती व्यवसायावर उपजिविका चालवली.काबाडकष्ट अनुभवले. प्रतिकूल परीस्थीतीतून मुलांना सुसंस्कृत घडवून उच्च शिक्षण दिले व आपल्या पायावर त्यांना उभे केले आहे. आजच्या युगात शुल्लक कारणांवरून भावंडामधील मतभेदांमुळे विखुरलेले परीवार दिसून येत आहे. अशा परीस्थीती या परिवाराने एकीच्या बळाचे दर्शन घडवून समाजासमोर आदर्श निर्माण केला तर आहेच पण तब्बल आठ मुलांसह सुनेला नायबतहसिलदार म्हणून घडविले असल्याने या परीवारामुळे भराडी गावाची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून होते.पाच भावंडासह चार सुना अधिकारी व डॉक्टर, शिक्षीका, परीचारीका शासकीय सेवेत असून नुकतीच त्यांच्या स्नुषा डॉ. चारूशिला चौधरी यांची नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली. नाशिक जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ प्रमुख डॉ. प्रमोद रमेश चौधरी असून नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागात लॅब प्रमुख योगेश रमेश चौधरी, जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता धनराज शंकर चौधरी, शिरूड पुणे येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद शंकर चौधरी, अमळनेर नगरपालिका रुग्णालयात परीचारीका बहिण मीना मधुकर चौधरी, स्नुषा वाकोद येथे शिक्षीका ज्योती धनराज चौधरी, नाशिक येथे डॉ. स्नेहल प्रमोद चौधरी, नाशिक पाटबंधारे विभागात वरीष्ठ लिपीक पदावर मनिषा योगेश चौधरी अशा विविध पदांवर कार्यरत आहे. यांच्या पैकी एकच मुलगा शिवाजी मधुकर चौधरी हा प्रगतीशील शेतकरी असून तब्बल पंचेचाळीस एकर जमीन सांभाळतोय.
एकाच परिवारातील नऊ जण उच्चपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:11 PM