जळगाव :
नवीन शैक्षणिक वर्षात नंदुरबारमधील संस्थांना नऊ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून इरादापत्रे मंजूर करण्यात आली आहे. ही महाविद्यालये कायम विना अनुदान तत्वावरील आहेत. त्यांना अंतिम मान्यतेसाठी मुदत देण्यात आली आहे.
संस्थेने नवीन महाविद्यालयास अंतिम मान्यता प्राप्त करण्यापूर्वी विहित अटी व शर्तींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने इरादापत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतिम मान्यता मिळाल्याशिवाय महाविद्यालय सुरू करता येणार नाही. इरादापत्र दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत वैध राहणार आहे. या महाविद्यालयांना अंतिम मान्यता मिळाल्याशिवाय विद्यापीठाने संलग्नता प्रदान करण्याची कार्यवाही सुरू करू नये, असेही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तोपर्यंत प्रवेशाला मनाई
महाविद्यालयांना इरादापत्राच्या आधारे विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नवीन महाविद्यालयात जो अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली आहे, तो विद्यापीठात असल्याची खातरजमा करून घ्यावी, अशी सूचना विद्यापीठाला करण्यात आली आहे.
शासनाने बृहत आराखड्यासाठी सूचना मागवल्या
१) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बृहत् आराखडा नव्याने तयार केला जाणार आहे. त्यासाठी शासनाने थेट सूचना मागवल्या आहेत. त्याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
२) जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व शिक्षणतज्ज्ञ यांना आपल्या सूचना १५ एप्रिलपर्यंत वेबलिंकमधील फॉर्ममध्ये भरून पाठवता येणार आहेत.
३) आजचे शिक्षण, उच्च शिक्षणाबाबत असलेल्या अपेक्षा, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास करून खान्देशात कोणते नवीन अभ्यासक्रम असावेत, नवीन महाविद्यालये कुठे असावीत याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचीही वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.