भुसावळ : येथील यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत मृतदेह घेवून येणाऱ्या वैकुंठवाहिनी चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन समोरून येणाऱ्या रिक्षासह दुचाकीवर धडकले. या अपघातात सुमारे नऊ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्मशानभूमीजवळील उतारावर हा अपघात झाला. या प्रकरणी शहर पोलिसात मात्र नोंद नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी शहरातून शव घेवून निघालेली शववाहिनी (एम.एच.१५ ए.जी.१४२१) ही स्मशानभूमीजवळील उतारावर आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन बऱ्हाणपूरहून जळगावकडे जाणाऱ्या रिक्षावर (एम.एच.१९ सी.डब्ल्यू.३७६६) वर धडकल्याने ही रिक्षा बाजूच्या खोलगट भागात कोसळून रिक्षातील पाच प्रवासी जखमी झाले. त्याचवेळी सावद्याकडून शहरात येणाऱ्या दुचाकीसही (एम.एच.१९ सी.टी.६३००) वैकुंठवाहिनीची धडक बसल्याने प्रशांत सापकर यांच्यासह त्यांची पत्नी व दोन्ही मुले जखमी झाले. दरम्यान अपघात घडताच आजुबाजुचे नागरिक लगेच मदतीसाठी धावून आले. जखमींवर तातडीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताला कारणीभूत वैकुंठवाहिनी असल्याने सामोपचाराने वादावर पडदा टाकण्यात आला तर संबंधिताना भरपाई देण्यात आल्याने तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
तिहेरी अपघातात झाले नऊ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:00 PM