जळगाव : राष्टÑीय महामार्गालगत बांभोरी येथे गिरणा नदीवरील पुलाची ९ वर्षांपासून दुरुस्तीच झाली नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक झाला आहे. दुरुस्तीअभावी पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी कठडे देखील तुटले आहे. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षामुळे या पुलावर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ लगत गिरणा नदीवर असलेल्या पुलाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ‘नही’ च्या दुर्लक्षामुळे या पुलावर प्रचंड खड्डे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी दोन पॅचमधून थेट गिरणेचे पात्र दिसून येत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती न झाल्यास पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या पुलावरून दररोज दिवसरात्र हजारो वाहने ये-जा करतात. याबाबत अनेक नागरिकांकडून संबधित विभागाकडून पुलाच्या दुरस्तीबाबत निवेदने पत्रव्यवहार झाले आहेत. ‘नही’ प्रशासनाला मात्र या पुलाच्या दुरुस्तीबाबत कोणतेही गांभिर्य दिसून येत नाही.दरम्यान, पुलाच्या गंभीर स्थितीबाबत ‘नही’ च्या अधिकाऱ्यांना विचारले असता पुलाला कोणताही धोका नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.तसेच पंधरा दिवस सलग पाऊस झाल्याने पुलावर खड्डे पडले असून, लवकरच खड्डे दुरुस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘लोकमत’ ने पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता पुलाला अनेक खड्डे पडलेले, तसेच कठडे तुटलेले आढळले.२५ टनाचे बंधन असताना ५० टनाची होतेय वाहतूक- या पुलाचे काम १९८० मध्ये करण्यात आले. पुलावरून एकाच वेळी २० ते २५ टन इतका लोड असणे आवश्यक होते. कालांतराने वाहतुकीची संख्या वाढत जात असल्याने सध्यस्थितीस पुलावरून ४० ते ५० टन इतका लोड पडत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजना होणे अपेक्षीत आहे.- या पुलाची दर दोन महिन्यांनी तपासणी होणे गरजेचे असताना ती तपासणी देखील प्रशासनाकडून केली जात नाही. दरम्यान, मान्सूनच्या आधी समितीकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती ‘नही’च्या अधिकाऱ्यांनी दिली होती. तसेच पावसाळ्यानंतर पुन्हा समितीकडून पाहणी होणार असल्याचे सांगण्यात आले.२०१० मध्ये झाली शेवटची दुरुस्तीहा पुल आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यावेळी २०१० मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती. पुलाची दर दोन वर्षात दुरुस्ती करणे गरजेचे होते. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर २०१४ मध्ये हा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘नही’कडे हस्तांतर करण्यात आला. ‘नही’कडून एक दाही पुलाची दुरुस्तीतर सोडाच खड्डे देखील दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.
नऊ वर्षांपासून गिरणा पुलाची दुरुस्तीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:23 PM