जळगाव : वडील घरात झोपलेले असताना मागच्या खोलीमध्ये जावून हर्षल विनोद पाटील (सूर्यवंशी) वय १३ या नववीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजता खोटे नगरातील मानवसेवा शाळेजवळ घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.घरातील एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सूर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना या घराबाहेर गेलेल्या होत्या. त्या सायंकाळी सहा वाजता घरी आल्या असता हर्षल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. कुठलेही कारण नसताना हर्षलने टोकाचा निर्णय का घेतला हा प्रश्न कुटुंबियांसह अनेकांना पडला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
जळगावात नववीतील मुलाची गळफास घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:19 PM