जळगाव : यावर्षी मनपाने शहरात पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या काही वर्षात शासनाने वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम हाती घेतल्याने त्यात वाढ झालेली आहे. यावर्षी मनपाने वृक्ष लागवडीची संख्या कमी केली असली तरी कमी लागवड करून, ते वृक्ष जगतील कसे यावर मनपाने अधिक भर दिला आहे. तसेच यंदा वृक्षप्रेमी नागरिकांनी वृक्ष जगविण्याची हमी दिल्यास त्यांना मोफत रोप देण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.
मनपाकडून दरवर्षी शहरात वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण करण्यात येत असते. यात सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांचाही समावेश केला जातो. मनपाकडून यंदा ज्या उद्यानांना व खुल्या जागांना संरक्षण कुंपन आहे. अशा ठिकाणी खड्डे खोदण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. यंदा पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ७५ रुपयांचे एक रोप याप्रमाणे ३ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. पर्यावरण विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. वाहुळेंची स्वाक्षरी झाल्यानंतर धनादेश सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या शनिवारपर्यंत मनपाच्या ताब्यात विविध प्रकारच्या रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.
वृक्ष देताना भरून घेतले जाईल हमीपत्र
मनपाच्या माध्यमातून वृक्षारोपण करताना शहरातील विविध संस्था, पर्यावरण प्रेमी संघटना, नागरिकांसह शाळांना रोप दिली जाणार आहेत. जे नागरीक वृक्ष लागवडीसह त्यांच्या वाढीसाठी जबाबदारी घेतील अशा नागरिकांकडून हमीपत्र भरून घेतले जाणार आहेत. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी केलेली लागवड गेली वाया
मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी व गेल्या वर्षी देखील शहरातील काही भागात लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड केली होती. विशेष कार्यक्रम घेऊन, फोटोसेशन करून कार्यक्रम केला. मात्र, लागवड करण्यात आलेले वृक्ष काही दिवसातच निगा न ठेवल्याने सुकल्याने काेरडी पडली. यामुळे यावर्षी तरी मनपा प्रशासनाने वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष कसे जगतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा कार्यक्रम केवळ फोटोसेशन पुरता होऊ नये, असे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.