लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पदवीपूर्व प्रवेश क्षमता वाढविण्याच्या निरीक्षणासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे दिल्लीचे पथक कधीही येऊ शकते, त्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी तयार रहावे, अशा सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहे. ज्या बाबींची तपासणी होणार आहे, त्यासाठी चार समित्यांची स्थापनाही करण्यात आली आहे.
कागदपत्र तपासणी, रुग्णालय पाहणी, महाविद्यालय पाहणी, ए फॉर्म भरण्यासाठी अशा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयातील बेडची संख्या, यंत्रसामग्री, जागेची उपलब्धता आदी बाबी समिती तपासत असते. आगामी दीडशे विद्यार्थ्यांच्या चौथ्या बॅचला यातून परवानगी मिळणार आहे. त्यामुळे समिती अचानक आल्यास तारांबळ नको म्हणून सर्वांनी आधिच तयार राहावे, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.