लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका प्रशासनाने मालमत्ताकराची थकबाकी वसुली करण्याची मोहीम हाती घेतली आहे. उर्वरित तीन दिवसात जास्तीत जास्त भरणा व्हावा यासाठी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना दररोजचे टार्गेट दिले आहे. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वसुलीचे टार्गेट अशा दुहेरी पेचातही मनपा प्रशासनाने यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक वसुली केली आहे. आतापर्यंत ४८ कोटींची वसुली झाली असून, आता तीन दिवसात वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यावर मनपा प्रशासनाचा भर आहे.
जळगाव शहरात महापालिकेच्या हद्दीत ८० हजार मिळकती असून, दरवर्षी २० मार्चपर्यंत सुमारे ६० टक्के मालमत्ता कराची वसुली पूर्ण होत असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मालमत्ता कराच्या वसुलीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत आहे. गेल्या वर्षीदेखील वसुलीचे टार्गेट ५२ टक्के इतकेच झाले होते, तर यावर्षीदेखील वसुलीचे टार्गेट ५६ टक्के इतकेच झाले आहे. ३१ मार्चपर्यंत उर्वरित मालमत्ता कर वसुलीचे अंतिम दिवस असल्याने आता महापालिकेच्या वसुली विभागाने कंबर कसली आहे. आयुक्तांनीदेखील प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वसुलीचे दररोजचे टार्गेट दिले असून, कुठे वसुली करणार आहे याची माहिती आधी देण्याचे सांगितले आहे.
आतापर्यंत १३ मोबाइल टॉवर सील
वसुली मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती ४चे अधिकारी उदय पाटील यांनी १३ मोबाइल टॉवर सील केले आहेत. २००हून नळसंयोजनदेखील तोडण्यात आले आहेत. यासह मनपाने मोठ्या थकबाकीदारांना टार्गेट करून त्यांच्याकडून वसुली पूर्ण केली आहे.
८८ कोटींची उद्दिष्टे
दरवर्षी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठरविले जाते. त्यानुसार २०२० ते २०२१च्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ८८ कोटींचे होते. त्यानुसार २० मार्चपर्यंत चारही प्रभाग समितीच्या ४० टक्के वसुलीचा आकडा होता. आतापर्यंत ४८ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
वसुलीसाठी उरले तीन दिवस
३१ मार्चपर्यंत २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची वसुली करण्याचा अवधी आहे. त्यामुळे तीन दिवसात वसुली विभागाला वसुलीसाठी कंबर कसावी लागणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भावामुळे तीन दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे वसुली व देखील काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभात समिती १ व २चे अधिकारी कोरोनाबाधित झाल्याने वसुलीवरदेखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे वसुलीचे टार्गेट अशा परिस्थितीतदेखील महापालिका प्रशासनाने बऱ्यापैकी मात केली आहे.
आतापर्यंत झालेली वसुली
प्रभाग समिती १- ६४% - १६.३७ कोटी
प्रभाग समिती २ - ४६% - ८.१० कोटी
प्रभाग समिती ३ - ४४% - १३.४३ कोटी
प्रभात समिती ४ - ७०% - १०.८८ कोटी