लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीओपी मूर्तींवर बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पीओपी मूर्तींवर बंदी येऊ नये म्हणून जिल्हा मूर्तिकार संघटनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी मूर्तिकारांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मूर्तिकार आहेत. सामान्यांसाठी पीओपी आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवल्या जातात. मात्र आता केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांच्या जाचक अटींमुळे पीओपी मूर्तीवर बंदी येण्याची शक्यता आहे. पीओपी ही मातीदेखील राजस्थानमधीलच आहे. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही तसेच राष्ट्रीय हरित लवादानेदेखील पीओपीमुळे कोणतेही प्रदूषण होत नसल्याचे मान्य केले आहे.
यावर लाखो लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे पीओपीवर बंदी आणू नये, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. यावेळी राज्यभरातून आलेले मूर्तिकार बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हा मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र महाजन, राजू पाटील, किशोर महाले, राज्य संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर, हेमंत कुलकर्णी, नारायण वाघ, भरत निंबाळकर उपस्थित होते.