स्टार ८२३
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सोशल मीडिया किंवा मोबाईल जितका हिताचा आहे, तितकाच तो घातक ठरू पाहत आहे. गेल्या काही वर्षापासून याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून लॉकडाऊनमुळे अभ्यासाच्या नावाखाली मुलांना मोबाईल दिला जात आहे. मात्र हा मोबाईल पालकांचे बँक खाते रिकामे करु लागला आहे. ना कॉल, ना ओटीपी तरीही आपल्या बँक खात्यातून पैसे कपात होऊ लागले आहेत. मुलं वेगवेगळ्या गेमच्या आहारी गेले आहेत, त्यातून ते गेम डाऊनलोड करतात त्यामुळे कळत न कळत पालकांच्या खिशाला त्याचा भुर्दंड बसत आहे.
बँक अधिकारी किंवा विमा कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत पैसे परस्पर वर्ग केल्याच्या घटनांनी तर कहरच केला आहे. अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर येथील एका शेतकऱ्याला विमा कंपनीत पैसे गुंतवल्यास दुप्पट मिळतील असे सांगून तब्बल १ कोटी ७३ लाख रुपयात गंडविण्यात आले आहे. या आठवड्यात सायबर पोलिसांनी दिल्लीच्या ठगाला अटक केली. एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात परस्पर पैसे देखील वर्ग झाल्याचे समोर आले आहे. घटना घडू नये म्हणून खबरदारी घेणे गरजचे आहे.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
-उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये कंपनीच्या नावे बँक खाती उघडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-फेसबुकवरून विविध जाहिरातींच्या आडून ठग नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात. यात अनेक जण बळी पडतात, असे गुन्हे उघडकीस आले तरी पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच असते.
- दुसरीकडे बनावट प्रोफाइलवरून आधी ओळख करुन घ्यायची. गोपनीय माहिती मिळवून फसवणूक करायची, अशा घटनाही वाढत आहेत. पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होत असून याला तर जळगाव जिल्ह्यात पोलीस अधिकारीही बळी पडलेले आहेत.
अनोळखी ॲप नकोच
- लहान मुले किंवा आपण मोबाईलचा वापर करतांना सहज ॲप डाऊनलोड करतो. डाऊनलोड करतांना आपली माहिती नकळत भरली जाते. त्यामुळे आपली फसवणुक होऊ शकते.
- सोशल मीडियाद्वारे गैरवापर वाढत असताना दाखल होणारे गुन्हे हे तांत्रिक पध्दतीचे असतात. गुन्हा दाखल झाला तरी संशयितांना पकडणे एवढे सोपे नाही.
- आपली कुठे फसगत होत असल्यास आपण सावध व्हायला हवे. तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून रितसर तक्रार द्यायला हवी. मुळात आपण फसायला नको याची काळजी प्रत्येकाने घेणे ही काळाची गरज आहे.
-सायबर सेलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले जाते. मात्र तरीही नागरिकांकडून फसवणुकीचे प्रकार घडतात. खबरदारी घेणे गरजचे आहे जिल्ह्यात सायबर सेलच्या माध्यमातून नागरिकांची मदत केली जाते.
वेळीच काळजी घेणे महत्वाचे आहे.
कोटीच्या घरात होते जळगाव जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूक
सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी २०१९ मध्ये ५८ तर २०२० मध्ये २३ असे एकूण ८१ गुन्हे सायबर पोलिसांकडे दाखल झाले आहेत. २०२१ मध्ये मेपर्यंत २१ गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील बहुतांश गुन्हे निकाली निघालेले आहेत. २०२० या वर्षात लॉकडाऊन असल्याने या गुन्ह्यांची संख्या कमी होती. २०१९ मध्ये अशा गुन्ह्यात १६ कोटी ७७ लाख ९४३ रुपयांची फसवणूक झाली होती तर १० लाख ६५ हजार ३०० रुपये हस्तगत करण्यात आले होते. २०२० मध्ये ४१ लाख ६७ हजार ७३६ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती तर त्यापैकी ६ लाख १० हजार रुपये वसूल झाले होते.
ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे
२०१९ : ५८
२०२० : २३
२०२१ : २१ (मे पर्यंत)
सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून करावा. सध्या फसवणूक व ब्लॅकमेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. ऑनलाईन व्यववहार असो की मोबाईलवर काही सूचना आली की त्याची पडताळणी करावी. शक्यतो अनोळखी व्यक्तीला प्रतिसादच देऊ नये. त्यातून आपली फसवणूक देखील होऊ शकते. बँक किंवा सरकार तुम्हाला मोबाईलवर कोणतीच सूचना पाठवित नाही किंवा फोन करीत नाही.
- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे