जळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही मूल वंचित राहणार नाही. याकरिता आरोग्य विभागाने आवश्यक ते नियोजन करावे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अन्य विभागांनी आरोग्य विभागास आवश्यक ते सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यात.
३१ जानेवारी रोजी आरोग्य विभागाकडून ही पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. याबाबत आवश्यक ते नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली.
या बैठकीला महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) दिलीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तडवी, डॉ. रावलाणी, डॉ. किरण सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित उपस्थित होते.