जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जात होती. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी असेल तरच नागरिकांना मध्ये सोडले जात होते. अन्यथा बाहेरूनच त्यांना परत पाठविले जात होते. त्यासाठी तेथे जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचारी आणि एक पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच कार्यालयाच्या बाहेरच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची प्रत चिकटविण्यात आली होती. तसेच आत जाणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासूनच त्यांना प्रवेश दिला जात असल्याचे पाहणीत दिसून आले.
प्रशासकीय इमारत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या या इमारतीत सहकार उपनिबंधक, कृषी अधीक्षक व महिला व बालकल्याण विभागाची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणीदेखील नागरिकांची नेहमीच ये-जा असते. तेथेदेखील सर्वच नागरिकांना प्रवेश नाकारण्यात येत होता. फक्त दुय्यम निबंधकांकडे जर आधीच नोंदणी केली असेल तर त्यांना आरक्षित वेळेत प्रवेश देण्यात येत होता.
प्रांतअधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या प्रांत अधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. तेथे लोखंडी बाकच दारासमोर आडवे ठेवून प्रवेश नाकारण्यात येत होता.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कँटीन
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर सर्व ठिकाणी प्रवेश नाकारला जात असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील कँटीनच्या आसपास मात्र अनेकजण घोळक्याने उभे होते. जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचे काम असले तरी सोबत आलेले इतर जण पार्किंग आणि कँटीनच्या आसपासच घुटमुळत होते. त्यांना तेथे कुणीही हटकत नसल्याचे पाहणीत दिसून आले.