जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात नेहमीप्रमाणे सकाळची कामे सुरू असतानाच गावातून उत्तरप्रदेश व नेपाळ येथे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाल्याची बातमी आली आणि आनंदात असलेले गाव चिंताग्रस्त झाले. वेगवेगळे निरोप येत असल्याने सायंकाळी अवघे गावच सुन्न झाले.
या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबातील चार- चार जणांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी वरणगाव येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आली. अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही.
१६ ऑगस्टला आपल्या नातेवाइकांना चैतन्यमय वातावरणात निरोप दिला. त्याच भाविकांवर काळाचा घाला झाला. ज्यांचे नातेवाइक या बसमध्ये होते, त्यांच्या मनाला चटका लागला. ते फोनवर फोन करीत होते. तिकडून येणाऱ्या प्रत्येक बातमीमुळे त्यांच्या काळजाची घालमेल वाढत होती.
त्यात सायंकाळी गावातील एका मुलीसह दहा भाविकांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण गाव सुन्न झाले. सायंकाळी एकाही घरात चूल पेटली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी वरणगावात भेट दिली.
जावळेवाडा, गणेशनगर सुन्नवरणगावमधील जावळे वाड्यात राहणारे सुधाकर जावळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर गणेश नगरातील संदीप भारंबे यांच्या कुटुंबातीलही चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.या दोन भागांमध्ये अवघ्या वरणगावातील नागरिक एकवटले होते. सुधाकर जावळे हे माजी नगरसेवक होते तर संदीप भारंबे हे देखील गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर राहायचे. त्यामुळे त्यांचा गोतावळा मोठा होता.
तळवेलला चूल पेटली नाहीमुक्ताईनगर (जि. जळगाव) : तळवेल (ता. भुसावळ) या गावात दुपारी १२ च्या सुमारास भीषण अपघाताचे वृत्त कळताच गावात दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव सुन्न झाले. अपघातग्रस्त बसमध्ये गावातील पाच कुटुंबातील ९ यात्रेकरू असल्याने अपघाताची विदारकता पाहता गावात एकही घरात शुक्रवारी चूल पेटली नाही.
‘त्यांचे’ दैव बलवत्तर होते म्हणून ते वाचलेपुणे : ‘यात्रेकरुसोबत तीन दिवसांपूर्वी माझे आई- वडील होते. त्यांचा आजार वाढल्याने ते परतले अन्यथा आज माझे आई-वडील घरी आले नसते. हा विचार करूनच छातीत धस्स झाले. पण, आज माझ्याच ओळखीतील अनेक लोकांचा मृत्यू झाला, याचंदेखील दु:ख आहे,’ अशी भावना पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केली.