आहार तज्ज्ञाची नियुक्ती : मनपा कोविड सेंटरच्या जेवणाबाबत तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि लोक संघर्ष मोर्चाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना चांगले आणि उत्कृष्ठ दर्जाचे पौष्टिक जेवण मिळते. मात्र महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत बरेच जण असमाधानी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरच्या जेवणाच्या दर्जाबाबत या आधीही अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या.
सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती न करता होम क्वारंटाईन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. असे असले तरी घरी स्वतंत्र खोली नसलेले रुग्ण शहरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती होत आहेत. मात्र शासकीय वैद्यकीय महविद्यालय आणि लोक संघर्ष मोर्चाचे कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळत आहे. महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. तेथे सध्या ८६ रुग्ण दाखल आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांसाठी जेवण दिले जात आहे. त्या रुग्णांनी नेमके काय आणि किती खाल्ले पाहिजे यासाठी तेथे डायटिशियनची नियुक्ती देखील आहे. डायटिशियनने ठरवून दिल्याप्रमाणे रुग्णांना आहार दिला जातो. त्यात प्रोटीनची पुर्तता करण्यासाठी उडकलेली अंडी, व्हिटामीन सीच्या पुर्ततेसाठी फळे दिली जातात. त्यासोबतच काढा देखील दिला जातो. जेवणात देखील दोन भाज्या,चपात्या यांचा समावेश असतो.
लोक संघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर
लोक संघर्ष मोर्चातर्फे जळगाव शहरात मोफत कोविड केअर सेंटर चालवले जाते. तेथे सकाळी रुग्णांना चहा आणि उकडलेली अंडी दिली जातात. नंतर नाश्त्यात पाच दिवस मोड आलेल्या कडधान्याची उसळ केली जाते. आणि आठवड्यातून दोन दिवस पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी यांचा समावेश केला जातो. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास जेवण दिले जाते.त्यात दोन भाज्या, चपाती, भात, सलाड यांचा समावेश असतो. चार वाजता पुन्हा चहा आणि एक फळ दिले जाते. तर रात्रीच्या जेवणात भाजी पोळी, खिचडी, साधी किंवा मसाले खिचडी यांचा समावेश असतो. रात्री झोपण्याच्या आधी हळद घातलेले दुध देखील दिले जाते.
महापालिकेचे कोविड सेंटर
सध्या येथे ८६ रुग्ण दाखल आहेत. असे असले तरी येथील जेवणाच्या गुणवत्तेवर अनेकवेळा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. त्याबाबत काही तक्रारी देखील समोर आल्या होत्या. येथे सकाळी चहासोबतच पोहे, उपमा किंवा ढोकळे असा नाश्ता दिला जातो. त्यानंतर दुपारी जेवणात तीन चपात्या, पातळ भाजी, साधा भात किंवा मसाले भात दिला जातो. दुपारी पुन्हा चहा आणि एक फळ दिले जाते. रात्रीच्या जेवणात ३ चपात्या, भाजी भात दिला जातो. आणि रात्री हळदीचे दुध दिले जाते.
लोकसंघर्ष मोर्चाच्या सेंटरमध्ये सकस आहार
लोक संघर्ष मोर्चाने सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकस आहार मिळत आहे. या आहारातूनच रुग्णांना आवश्यक ते पौष्टिक घटक, प्रोटीन आणि व्हिटॅमीन योग्य पद्धतीने मिळतील, याकडे लक्ष दिले जाते. त्याच प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील रुग्णांच्या जेवणाकडे लक्ष दिले जाते.