‘लोकमत’चा एसटीप्रवास : जळगाव ते पाचोरा
जळगाव : ७ जून पासून सर्वत्र अनलॉक झाल्यानंतर महामंडळातर्फे सर्व मार्गावर बससेवा सुरू करण्यात आली आहे. कोरोना रूग्ण संख्येचे प्रमाण कमी झाले असले तरी, महामंडळातर्फे प्रवाशांसह चालक व वाहकांनाही मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याबाबत वारंवार सूचना करण्यात येत आहे. मात्र, ''लोकमत'' प्रतिनिधीने मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास जळगाव ते पाचोरा या बसमध्ये प्रवास केला असता महामंडळाच्या कुठल्याही सूचनांचे चक्क चालक- वाहकांकडूनही पालन होतांना दिसून आले नाही. प्रवाशांसह चालक व वाहकही ना मास्क ना सोशल डिस्टनिंग अशा पद्धतीने प्रवास करतांना दिसून आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा बळावण्याची शक्यता दिसून आली.
कोरोनामुळे गेल्या महिन्यात १ मे पासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने, एसटी महामंडळाची सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच काही तालुक्यांना बसेस सोडण्यात येत होत्या. कोरोनामुळे महामंडळाची ९० टक्के सेवा बंद असल्यामुळे एकट्या जळगाव विभागाचे १८ कोटींच्या घरात आर्थिक नुकसान झाले. मात्र,शासनाने ७ जून पासून लॉकडाऊन मधील निर्बंध पूर्णतः उठविल्याने महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे पूर्वीप्रमाणे सर्व मार्गावर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
तसेच बस मधील ५० टक्के प्रवाशी क्षमतेची अटही रद्द केल्यामुळे पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक सुरू केली आहे. मात्र, ही वाहतूक करतांना प्रवाशांसह महामंडळाचे कर्मचारीही बेफिकिरीने वागताना दिसून आले. जणू काही कोरोना गेलाच, अशा पद्धतीने बसमध्ये काही प्रवाशी प्रवास करत असताना, बसमधील वाहक मात्र या कुठलिही सूचना करतांना दिसून आले नाही. विशेष म्हणजे या बस मधून प्रवास करताना सबंधित वाहकच अधून-मधून मास्क उतरविताना दिसून आला. तर दुसरीकडे चालकाने मास्क लावलेलाच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एकीकडे महामंडळातर्फे मास्क व सोशल डिस्टनिंगचे पालन करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत असताना, दुसरीकडे मात्र कर्मचारीच नियमांचे उल्लंघन करताना दिसून आले.
इन्फो :
१)शिरसोली येथे उतरला एक प्रवासी
जळगाव ते पाचोरा या बस मध्ये जळगावहून आपल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी एकूण ३३ प्रवाशी बसले. या प्रवाशांमध्ये पुरुष प्रवाशांची संख्या जास्त होती. यात पहिल्या थांब्यावर शिरसोली येथे गाडी थांबली. या ठिकाणी फक्त एकच प्रवासी बस मधून खाली उतरला. तर एकही प्रवासी बस मध्ये चढला नाही.
२)रामदेव वाडी येथे तीन प्रवाशी उतरले
शिरसोली गाव गेल्यानंतर पुढे पाच किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या रामदेववाडीच्या थांब्यावर तीन प्रवाशी उतरले. उतरताना यातील एकाही प्रवाशाच्या तोंडावर मास्क दिसून आला नाही. मात्र, या गावाहूनही एकही प्रवाशी बसमध्ये चढला नाही.
३) वावडदा येथे पाच प्रवाशी उतरले व एक चढला
पाचोरा ते जळगाव या बस मार्गावरील तिसऱ्या थांब्यावरील वावडदा गाव येथे पाच प्रवाशी बस मधून उतरले तर एक प्रवासी बसमध्ये चढला. बसमध्ये चढताना या प्रवाशाच्या तोंडावर मास्क नव्हता. असे असताना संबंधित महिला वाहकाने या प्रवाशाला बस मध्ये प्रवेश दिला.
४) वडली येथे उतरले दोन प्रवासी
या नंतरच्या थांब्यावर वडली येथे दोन प्रवाशी बस मधून उतरले. उतरताना या प्रवाशांनी मास्क उतरवून टाकला होता. या प्रवाशां नाही मास्क घालण्याबाबत महिला वाहकाने कुठलिही सुचना वा विनंती केलेली दिसून आली नाही. तसेच या ठिकाणाहूनही या बसला प्रवाशी मिळाला नाही.
इन्फो :
चालकाचा एका तासाच्या प्रवासात अनेकवेळा मास्क खालीवर
जळगाव ते पाचोरा हा बसने एका तासाच्या प्रवासाचा मार्ग आहे. मात्र, या एका तासाच्या प्रवासात बस वरील चालक दर दहा ते पंधरा मिनिटाने मास्क खालीवर करताना दिसून आला. विशेष म्हणजे जळगावहून बस काढतांना या चालकाच्या तोंडावर मास्कच दिसून आला नाही. प्रत्येक गावाचा थांबा आल्यावर हा चालक मास्क खाली करत होता. तसेच प्रवाशांशी बोलतांनाही मास्क उतरवूनच बोलताना दिसून आला.
इन्फो :
महिला वाहकाचा प्रवासात पूर्णवेळ मास्क
जळगाव ते पाचोरा या एका तासाच्या प्रवासात मात्र या बसवरील महिला वाहकाने प्रवासात पूर्णवेळ मास्क परिधान केलेला दिसून आला. प्रवाशांना तिकीट देतांना तोंडावरच मास्क होता. प्रत्येक थांब्यावरुन प्रवाशी चढताना त्यांच्याशी मास्क चेहऱ्यावर ठेवूनच संवाद साधत होत्या. एका तासाच्या प्रवासात एकाही वेळा मास्क उतरविलेला दिसून आला नाही.
इन्फो :
प्रवाशांकडून सोशल डिस्टनिंगचा फज्जा
एकीकडे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन करण्यात येत असताना, दुसरीकडून प्रवाशांकडूनही नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले. जळगाव ते पाचोरा या बस मध्ये अनेक प्रवाशी विना मास्क प्रवास करताना आढळून आले.तसेच बस मध्येही सोशल डिस्टनिंगचे कुठलेही पालन न करता प्रवाशी बसले होते. विशेष म्हणजे एका आसनावर तीन प्रवाशी बसलेले दिसून आले.