जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्थानकातील चौकशी केंद्रावर दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आगारातून जाणाऱ्या व बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसची नोंदणी करणे, वेळेनुसार बाहेरगावी बस सोडणे, प्रवाशांना बस लागल्याची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे देणे, चौकशीसाठी आलेल्या प्रवाशांना बसच्या वेळेची माहिती देणे, बाहेरगावाहून आलेल्या गाड्यांची वेळ नोंद करणे आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात.
इन्फो :
...तर काही प्रवाशांना समजावताना येते नाकीनऊ :
चौकशीसाठी येणारे काही प्रवासी नियमित प्रवास करणारे असतात, तर काही गरज पडल्यावर बसने प्रवास करणारे असतात. हे कधीकाळी बसने प्रवास करणारे प्रवासी वेळेवर गाडी लागली नाही, तर लगेच चौकशीसाठी येतात. बाहेरगावाहून बस येत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बसला १० ते १५ मिनिटे उशीर होतोच. मात्र, हे प्रवासी वेळ झाल्यावरही गाडी का लागली नाही, ती गाडी केव्हा येईल, आगार प्रशासनाचे काही नियोजन आहे का, मग दुसरी बस सोडा यासह काही प्रवासी तर मोठ्या आवाजात आमच्या कामाची पद्धतही काढतात. अशा वेळी संतप्त प्रवाशांना बसच्या विलंबाने होत असलेल्या कारणांंबाबत समजावताना नाकीनऊ येत असल्याचेही बोदवडे यांनी सांगितले.
इन्फो :
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी वर्षातून एकदा शिबिर :
दररोज जळगाव आगारात ड्युटीच्या वेळेत दोन ते तीन हजार प्रवाशांशी संवाद साधला जातो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी भेटतात. एक मिनिटाची चौकशी असली तरी, तासभर चौकशी करतात. यामुळे कधीकधी संताप येतो, राग येतो. मात्र, तो प्रवाशांवर, कधी कुटुंबांवर काढत नाही. प्रवाशांशी गोड बोलून तक्रारींचे निवारण करण्याची सवयच झाली आहे. मात्र, आमचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आगार प्रशासनातर्फे दरवर्षी पुणे येथे `चिंतामु्क्त आरोग्य शिबिर` घेण्यात येत असल्याचेही बोदवडे यांनी सांगितले.