जळगाव : स्त्री ही एक महिला म्हणून कितीही हतबल असली, तरी आई म्हणून सर्वाधिक ताकदवान आहे. आईसारखे कोणीही ताकदवान नाही. आईच्या मायेची संजीवनी सारखे कोणतेही रामबाण औषध त्रिखंडात सापडणार नाही, असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी निला सत्यनारायण यांनी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या ‘आश्रय माझ घर’ या मतिमंद मुलांसाठीच्या (विशेष मुलासाठी) संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्ष्यस्थानी जैन श्रावकसंघाचे मंत्री कस्तुरचंद बाफना होते. व्यासपीठावर ‘आश्रय’चे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव होते.निला सत्यनारायण म्हणाल्या की, एका मतिमंद मुलाची आई या नात्याने मी सांगू इच्छिते की, आश्रयसारख्या संस्था जागोजागी हव्या. कितीजरी श्रीमंत आईबाप असले तरीही ते आपल्या विशेष मुलासाठी सवंगडी मिळवून देऊ शकत नाहीत. ते आश्रयसारख्या संस्थेतच मिळतात. सवंगडी मिळवून देण्याचे काम ही संस्था करतेय. ही कौतुकास्पद बाब आहे.कारण विशेष मुले ही लहान असतात तेव्हा आईवडिल त्यांचा सांभाळ करू शकतात. मात्र ही मुले मोठी होतात. त्यांच्यातील ताकदही वाढते. आणि आईवडिल म्हातारे होतात. तेव्हा या मुलांचा सांभाळ करणे त्यांना अवघड होते. आपल्यानंतर या मुलांचा सांभाळ कोण करणार? अशी चिंता सतावायला लागते. अशा पालकांसाठी आश्रम ही संस्था निश्चितच दिलासा आहे. मात्र अनेक पालकांना ही विशेष मुल अडसर वाटतात. तसेच बाहेर सोबत न्यायायलाही कमीपणाचे वाटते. अशा पालकांना ही विशेष मुले बोझ वाटतात. त्यांची मुले आश्रयने सांभाळायला घेऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. कारण या मुलांना आश्रयसारख्या संस्थेत मिळणारे सवंगडी तर हवेतच त्यासोबत आई-वडिलांचे प्रेमही मिळायला हवे.त्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे मांडण्यात आलेली ‘डे-केअर’ सेंटरची संकल्पना अधिक स्तुत्य असून ती संकल्पना उचलून धरावी. त्यासाठी गरज भासल्यास मदतीसाठी नेहमीच तयार राहू, असे आवाहनही त्यांनी केले.अध्यक्षीय भाषणात कस्तुरचंद बाफना यांनी ‘आश्रय’च्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ.प्रताप जाधव यांनी ‘आश्रय’च्या वाटचालीची माहिती देऊन केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे लवकरच ‘डे-केअर’ सेंटरही सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.
स्त्री ही कितीही हतबल असली तरी आई म्हणून सर्वाधिक ताकदवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 6:49 AM