आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने गरीबासाठी पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्षात मंजूर थाळीची संख्या आणि लाभार्थींची संख्या लक्षात घेता दररोज किमान ५० पेक्षा जास्त जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करतांना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.
राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेत जिल्ह्यात एकुण ३८ केंद्रे आहेत. त्यात ३४२५ थाळ्या लाभार्थ्यांना दिल्या जात होत्या. त्यात जिल्हा प्रशासनाने दीड पट वाढीव इष्टांकांनुसार ५१२५ थाळ्या मंजूर करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थ्यांची संख्या पाहता शहरात विविध भागात १५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून १७२५ लाभार्थ्यांना भोजन दिले जाते. मात्र सध्या लाभार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात आणखी दोन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच आणखी २५० थाळ्या उपलब्ध होऊ शकतील.
५० जण उपाशी पोटी परतले
चित्रा चौकातील शिवभोजन केंद्र - चित्रा चौकातील शिवभोजन केंद्रावर दाणा बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचीच जास्त गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते. किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.
विसनजी नगरातील केंद्र - मुख्य रस्त्यावर विसनजी नगरात असलेल्या शिवभोजन केंद्रांवर दररोज दुपारी १२ वाजेपासून गर्दी सुरू होते. मात्र काही वेळातच येथे ७५ शिवभोजन थाळ्यांचा कोटा संपतो. मग अनेकांना मिळेल. त्या अन्नावर गुजरान करावी लागते. किंवा अन्य ठिकाणी जावे लागते. काही जण येथुनही उपाशी परततात. या आधीदेखील येथे सेवाभावी संस्थेतर्फे मोफत खिचडीचे वाटप केले जात होते.त्यामुळे येथे केंद्रावर बरीच गर्दी असते.
दररोज भरते साडेतीन हजार नागरिकांचे पोट
जिल्ह्यात दररोज ५१२५ थाळींचे वितरण केले जाते. मात्र त्यासोबतच अनेकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे.त्यामुळे बहुतेक केंद्रावर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळीकेंद्र - ३८
रोज लाभार्थ्यांची संख्या - ५१२५
शहरातील केंद्र - १५
शहरातील दररोज थाळींची संख्या - १७२५