जळगाव : जिल्ह्यात आता रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली होती. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली होती; मात्र आता नवे कोणतेही आदेश न निघाल्याने ही संचारबंदी ५ जानेवारीलाच संपली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनासाठीचे संचारबंदीचे कोणतेही आदेश नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क, सॅनिटायजेशनचे नियम आणि शासनाने वेळोवेळी कळवलेले निर्देश कायम आहेत. त्यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ५० लोकांच्या प्रवेशाची मर्यादा कायम आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचे आदेश
जळगाव : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खुल्या जागेत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तमाशा यांना परवानगी दिली जात नव्हती.
ही परवानगी देण्यात यावी, असे आदेश राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अशा कोणत्याही कार्यक्रमांसाठी परवानगी अद्याप नाकारण्यात आलेली नाही. बंदिस्त जागेत नियमांच्या अधिन राहून कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खुल्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्याबाबतच्या तक्रारी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्या होत्या; मात्र या तक्रारी दूर करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने पत्र काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत; मात्र जळगाव जिल्ह्यात अशा खुल्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कुणीही परवानगी मागितलेली नाही, तसेच बंदिस्त जागेत कार्यक्रम करण्यास ज्यांनी परवानगी मागितली आहे, त्यांना ती देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.