जळगाव : जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी २०२५ गावात ३ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील ८५० गावांसाठी तब्बल १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणालाही तहानलेले राहू देणार नसल्याचा संकल्प राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केला.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी जळगाव येथे नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार सुरेश भोळे, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम यांचीही उपस्थिती होती.
या आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याचा निकषावर आखण्यात आल्या होत्या. त्या जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई निकषावर आखण्यात आली आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली.
स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यासाठी ३१४ कोटी रुपयांची तरतूद
स्वच्छता विभागातर्फे जळगाव जिल्ह्याला तब्बल ३१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वैयक्तिक शोषखड्डे, कचराकुंडी, सामूहिक शौचालयांसह इतर बाबींचा समावेश आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली. तसेच किशोर राजे निंबाळकर यांनी जलजीवन प्राधिकरणात राज्यभरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.
आ.चिमणराव पाटील यांची पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमने...
सेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याप्रसंगी या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पारोळ्यात झालेल्या सेनेच्या मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांच्यासमक्षच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर जाहीर भाष्य करीत गैरसमज टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात या दोघांकडे शिवसैनिकांचेही लक्ष होते. मात्र व्यासपीठावर शेजारीच बसलेल्या दोघांनी आपसात संवाद साधला. आपल्या भाषणात आ.चिमणराव पाटील यांनी पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमनेही उधळली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वांना शुध्द पाणी मिळणार असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांमुळेच मजिप्राचे कार्यालय मान्यता मिळाल्यानंतर लगेच सुरू झाले. त्यामुळे आता ग्रामीण भागात घरापर्यंत पाणी पोहोचेल, असे सांगितले.