लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जळगाव शहरात थैमान घातले आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यानंतर जुलैपर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकदेखील उपस्थित राहत नसल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या काळात नेरी नाका स्मशानभूमीत जवळपास ५० मृतदेहांवर नातेवाईकांच्या अनुपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात कोरोनाची दहशत कमी होत गेली. आता सर्वच मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत असताना नातेवाईक उपस्थित असतात. मात्र काही जण अजूनही मृतदेह असलेल्या रॅपिंग बॅगला हातही लावत नाहीत. अशा वेळी सर्व कामे मनपा कर्मचाऱ्यांनाच करावी लागत आहेत.
वर्षभरात कोरोनाने अनेकांचे जीव घेतले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महामारीच्या काळात अनेकांचे संसार रस्त्यावर आले. आतापर्यंत कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी आवर्जून हजेरी लावत किंवा नंतर द्वारदर्शनासाठी तरी जात असत. मात्र कोरोनाच्या काळात फक्त जवळचे नातेवाईकच अंत्यसंस्काराला जात आहेत. वर्षभरापासून तर द्वारदर्शनदेखील बंदच आहे.
जळगावच्या नेरीनाका येथील स्मशानभूमीत आतापर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील शेकडो कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यासाठी मनपाने तेथे कर्मचारीदेखील नेमले आहेत.
गेल्या एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात कोरोनावर फारशी उपचार पद्धती समोर आलेली नव्हती. त्यामुळे बाधितांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराला अनेक अडचणी येत होत्या. मृतांचे नातेवाईक समोर येत नव्हते. त्यामुळे प्रशासनालाच त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. जून ते जुलै या काळात या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या.
पाच जणांना परवानगी, अनेकांच्या नशिबी तेही नाही
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्ययात्रेत २० जणांना परवानगी आहे. मृतदेह हा वेगळ्या प्रकारच्या रॅपिंग बॅगमध्ये ठेवला जातो. अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पीपीई किट घालावी लागते. मात्र अनेक मृतांच्या नशिबी नातेवाईकांच्या नाही तर मनपा कर्मचाऱ्याच्या हातूनच अग्नी आहे. जुलैच्या आधी नातेवाईक स्मशानभूमीतदेखील येत नव्हते. आता नातेवाईक किमान स्मशानभूमीत येतात. मात्र काहीजण भीतीपोटी त्या रॅपिंग बॅगला हातदेखील लावत नाही किंवा कोणतेही क्रियाकर्म करत नाहीत.
जळगाव शहरात कोरोनाने झालेले मृत्यू - ४९५
नेरी नाका स्मशानभूमीत नातेवाईकांशिवाय झालेले अंत्यसंस्कार - जवळपास ५०
कोट -
गेल्या वर्षभरापासून आम्ही कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत आहोत. त्यात बहुतेकवेळा नातेवाईकदेखील येत नाहीत. हे प्रमाण मागच्या वर्षी जुलैच्या आधी होते. आतादेखील अनेक जण स्मशानभूमीत येतात मात्र मृतदेहाला हात लावत नाही. अशा वेळी आम्हालाच सर्व काही करावे लागते.
- धनराज सपकाळे, अंत्यसंस्कार करणारे.