लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने हे शैक्षणिक वर्ष सुध्दा वाया जाते की काय? अशी भीती मनामध्ये असताना, शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी दहावी व बारावीची परीक्षा सुध्दा रद्द झाली. परिणामी, जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ५३ हजार विद्यार्थी विनापरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. कोरोना पावल्याने मुले खूश आहेत, पण, मुलांचा पुरेसा अभ्यास न झाल्यामुळे पालक चिंतेत आहेत.
कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्यानंतर गतवर्षी मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद झाली. कोरोनाचा संसर्ग कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बोलविणे शक्य नसल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ही परीक्षा होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. कालांतराने या परीक्षा सुध्दा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या पाहता, या दोन्ही परीक्षा रद्द करण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. नववी व अकरावीची देखील काही शाळा, महाविद्यालयांकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.
शहरी व ग्रामीण
शहरी भागात ऑनलाइन शिक्षणाला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र वर्षभरात पाहायला मिळाले. मात्र, याच्या उलट ग्रामीण भागात पाहायला मिळाले. अपुऱ्या सुविधांमुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही, अशा सुमारे लाखाच्या वर विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिल्याची बाब शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली होती..
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे
ऑफलाइन शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालयात जाणे आवश्यक आहे. दररोज घराबाहेर जाण्यात वेळ, ऊर्जा आणि पैशाचे नुकसान देखील होते. घरी ऑनलाइन शिक्षण मिळवल्याने संसाधनांचा खर्च वाचतो आणि वेळ व शक्तीही वाचते. जर ऑनलाइन वर्गाच्या वेळी विद्यार्थ्याला एखादा मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल, तर तो शिक्षकांना पुन्हा तो मुद्दा सांगण्यास सांगू शकतो. याशिवाय विद्यार्थ्याला कोणताही टॉपिक जर समजत नसेल, तर तो रेकॉर्ड केलेल्या लेक्चरला पुन्हा पाहू शकतो. ऑनलाईन शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, विद्यार्थी देशातील व परदेशातील कोणत्याही संस्थेचे शिक्षण मिळवू शकेल. ऑनलाईन शिक्षणाद्वारेच विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास पूर्ण केला. घरातच शिक्षण मिळवून ती कोरोनाच्या धोक्यातूनही वाचली आणि शाळा व महाविद्यालयात जाण्याचा त्रास व खर्च वाचला. शहरात मिळणारे दर्जेदार शिक्षण गावातील मुलांना देखील मिळत आहे.
ऑनलाईन शिक्षणाचे तोटे...
ऑनलाईन शिक्षणाचे एक नुकसान असे आहे की, देशात बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली असते आणि म्हणून ते एवढा महाग मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊ शकत नाहीत आणि म्हणून मागासलेल्या क्षेत्रात विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहतात़. तसेच असे बरेच भाग असतात, जिथे नेटवर्कला अडचण येते, अशा वेळेस विद्यार्थ्यांना अडचण येत असते. मोबाइल किंवा संगणकासमोर जास्त बसल्याने मुलांना डोळ्याला आणि कानाला त्रास होऊ शकतो. मोबाईलवर अभ्यास असल्यामुळे मुलांचे मन विचलित होऊ शकते. ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते. घरी बसून शिक्षण होत असल्याने ते मित्र-मैत्रिणींना भेटू शकत नाहीत आणि यामुळे एकलकोंडे होण्याची भीती वाढते.
------------
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा : १८२८
खासगी अनुदानित शाळा : ९६२
खासगी विनाअनुदानित शाळा : १५६
०००००००००००००
एकूण विद्यार्थी
पहिली : ७६५१४
दुसरी : ७९३१३
तिसरी : ७७९१८
चौथी : ८००५०
पाचवी : ७८८२८
सहावी : ७७३११
सातवी : ७७६७७
आठवी : ७६३८५
नववी : ७६३५८
दहावी : ५८३१७
अकरावी : ४५८९४
बारावी : ४९४०३