भूषण श्रीखंडेजळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवासी रात्र-दिवस येत असतात. यात मोठ्या प्रमाणात महिलांचादेखील समावेश आहे. मात्र, जळगाव रेल्वे स्टेशन येथे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर दिसून येत असून रेल्वे पोलिस दलामध्ये केवळ एकच महिला पोलिस कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
जळगाव रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे लाइनवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावरून मुंबई तसेच सुरत रेल्वे लाइन जात असून या रेल्वे स्थानकावरून दिवसाला सुमारे १०० रेल्वे गाड्या थांबतात. त्यामुळे हजारो प्रवासी दररोज जळगाव रेल्वे स्थानकावर येतात. त्यात महिला प्रवाशांची संख्यादेखील मोठी असून रात्री असलेल्या रेल्वे गाड्यांनी जाण्यासाठी महिला प्रवाशांची गर्दी नेहमी असते. त्यात जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस दलात केवळ एकच महिला कर्मचारी असल्याने जळगाव रेल्वे स्थानकावरील महिला प्रवाशांची सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत मुंबई येथे मध्य रेल्वे सल्लागार समितीची झालेल्या बैठकीत जळगाव येथील सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी हा प्रश्न उपस्थित करून मध्य रेल्वे पोलिस दलाचे मुख्य आयुक्त ऋषी कुमार शुक्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव रेल्वे स्थानकामध्ये महिला रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली आहे.
महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्नजळगाव रेल्वे स्थानक परिसरात महिला रेल्वे पोलिस कर्मचारी फक्त एकच असून रात्री-अपरात्री महिला प्रवासी या रेल्वे स्थानकावर असतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस कर्मचारी वाढविण्याची गरज आहे.
- विराज कावडिया, मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य.