लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेतील सध्याचे अस्थिर राजकारण पाहता, काही जणांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, भाजपच्या कोणत्याही ज्येष्ठ नगरसेवकाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शिवसेना प्रवेशासाठी भेट घेतली नसल्याचा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे.
‘लोकमत’मध्ये सोमवारच्या अंकात ‘शिवसेनेत येतो, विधानसभेची उमेदवारी देणार का?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तानंतर सोमवारी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे पाटील, स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी व अरविंद देशमुख यांच्या शिष्टमंडळाने लोकमत शहर कार्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने भाजपचा कोणताही ज्येष्ठ नगरसेवक या काळात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सध्या सुरू असलेल्या मनपातील राजकारणामुळे काही जणांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काही नगरसेवकदेखील सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात होता. मात्र भाजपचे अन्य कोणतेही नगरसेवक आता सेनेच्या संपर्कात नसल्याचा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे.