लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सालारनगर आणि मिल्लतनगर या महामार्गांच्या दोन्ही बाजुूना राहणारे नागरिक सातत्याने भुयारी मार्ग करून देण्याची मागणी करत आहे. मात्र आता तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सालार नगरवासीयांनी भुयारी मार्ग नाही, तर किमान पादचारी पुल तरी उभारून देण्याची मागणी एका निवेदनातून केली आहे.
परिसरातील नागरिकांनी फारुक शेख यांच्या नेतृत्वात हे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर वाहनांचा वेगदेखील वाढतो. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडण्यासाठी किमान पादचारी पूल तरी बांधून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
अजिंठा चौक ते इच्छादेवी या दोन्ही मार्गाचे सर्व्हिसरोड त्वरित तयार करण्यात यावे, अजिंठा चौकापासून मिल्लत हायस्कूलकडे जाणाऱ्या जुन्या अंडरपासमधून जो पाण्याचा निचरा होतो तेथील तीनपैकी एका मार्गात दोनचाकी, तीनचाकी व पायी जाणाऱ्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, चेंज ऑफ स्कोपमधील शिल्लक असलेल्या दोन ते तीन कोटी रुपयांच्या रकमेतून अंडर पासच्या ठिकाणी फुटओव्हर ब्रिज उभारून देण्यता यावा, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली आहे.