लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आता थेट अभ्यागतांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. केवळ निकषानुसार ५० टक्के उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी सदस्यांना जि. प. त एंट्री राहणार आहे. दरम्यान, जर काही तक्रारी असल्या, कामे असली तर जि. प. प्रशासनाशी फोनवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
जि. प.च्या ग्रामपंचायत विभागात पुन्हा एक कर्मचारी बाधित आढळून आले आहेत. अनेक दिवसांपासून या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने १ एप्रिलपासून ५० टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर अभ्यांगताना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे पोस्टरही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
तर पासचा पर्याय
अभ्यागतांनी वेबसाईट व फोन व्हाट्स ॲप द्वारे त्यांच्या शंकाचे निरसन करायचे आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा लावण्यात येणार आहे. दरम्यान, आगामी काळात विभागांमधील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागतांना पास दिला जाणार असून संबधित विभागाशी आधी संपर्क केला जाणार आहे. त्यानंतर अभ्यागताना त्या विभागात पाठविले जाणार आहे. मंत्रालयात असलेली ही यंत्रणा आता मिनी मंत्रालयात लावण्याचे नियाेजन केले जात आहे.
१९ रोजी सर्वसाधारण सभा
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेेचे १९ एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. यासह १२ एप्रिल रोजी स्थायी समितीची ऑनलाईन सभा होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे.