जळगाव : अनुदानित सिलिंडरची किंमत कमी झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ग्राहकांना मिळणारी सबसिडीदेखील कमी झाली आहे. यामध्ये घरगुती वापराच्या प्रत्येक गॅस सिलिंडरवर आता तीन ते चार रूपये सबसिडी दिली आहे. त्यामुळे पूर्वी १५० ते २०० रुपये मिळणारी सबसिडी आता अत्यंत कमी झाल्याने सिलिंडरवर सबसिडी नावालाच असल्याचे चित्र आहे.
अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत जसजशी वाढत जाते तसतशी अधिकचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळे पूर्वी ७०० ते ७५० रुपयांपर्यंत गेलेल्या सिलिंडरची किंमत आता ६५० रुपयांवर आली. त्यामुळे मिळणारी सबसिडीदेखील कमी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तर ही सबसिडी कधी-कधी शुन्यावर आली. मात्र सरासरी पाहता ग्राहकांना केवळ तीन ते चार रुपयांवर सबसिडी मिळत आहे. अनुदानित सिलिंडरची किंमत कमी झाल्याने सबसिडी मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र ग्राहकांचा विचार केला तर सिलिंडरची किंमत वाढली असल्याने ग्राहकांना झळ बसत आहे.
घरपोच डिलिव्हरीचे पैसे घेतल्यास कारवाई
जिल्ह्यात काही ठिकाणी घरपोच सिलिंडरचे अतिरिक्त पैसे घेतल्यास कारवाई कऱण्याचा इशारा या पूर्वीच देण्यात आला आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत तशा सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. घरपोचसाठी पैसे घेतले जात असतील तर तशा तक्रारी करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
अनुदानित सिलिंडरची किंमत कमी झाल्याने सबसिडीदेखील कमी झाली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडरवर मिळणारी सबसिडी सहा महिन्यांपासून कमी असल्याचे दिसते. घरपोच सिलिंडरचे अतिरिक्त पैसे घेतल्यास तक्रार करता येते.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी
गेल्या सहा महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद झाली आहे. यामुळे सिलिंडरच्या अनुदानाचा काहीही फायदा होत नसून अनुदानित सिलिंडर नावालाच राहिले आहे. तसे यापूर्वीदेखील अनेक वेळी सबसिडी मिळत नसायची.
- विनायक जाधव, ग्राहक
जिल्ह्यातील सिलिंडरधारक -१०,५०,०००
गॅस वितरक - ९६
अनुदानित सिलिंडरची किंमत - ६५०
मिळणारी सबसिडी - ३ ते ४ रुपये