जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार (17 डिसेंबर) पासून पूर्वीप्रमाणेच कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपूर्वी हे रुग्णालय कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तसेच नॉन कोविड रुग्णांना वेळेत चांगल्या सुविधा व उपचार मिळण्यासाठी याठिकाणी पुन्हा इतर रुग्णांवर उपचाराची सुविधा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिली. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन रुग्णालय प्रशासनाने केलेल्या पूर्वतयारीची पाहणी केली व आवश्यक त्या सुचना केल्यात. यावेळी त्यांच्यासमवेत प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अद्यापही याठिकाणी 65 कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीत पूर्वीप्रमाणेच 300 बेड हे नॉन कोविड रुग्णांवर उपचारासाठी असतील तर 125 बेड हे कोविड रुग्णांवर उपचारासाठी ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या कालावधीत याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मनुष्यबळही उपलब्ध आहे त्यामुळे याठिकाणी जिल्ह्यातील नागरीकांना उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा व उपचार मिळणार आहेत. भविष्यात कोरोनाची परिस्थिती उद्भवली तरी त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक - अधिष्ठाता डॉ. रामानंद
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारास येणाऱ्या पात्र रुग्णांना शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देता यावा. याकरीता रुग्णांनी उपचारासाठी येतांना रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणावे. असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केले आहे. महाविद्यालयात उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा निर्माण केल्याने रुग्णांनाही चांगले उपचार मिळणार आहे. केसपेपर काढण्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग असेल असेही डॉ रामानंद यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 15 हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून शासनाकडून लस प्राप्त झाल्यानंतर लस देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.
रुग्णालयातील बदलांवर एक दृष्टिक्षेप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाव्यतिरिक्त (नॉन कोविड) इतर सेवा सुरु करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली 1 डिसेंबरपासून सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका परिश्रम घेत आहेत. हे रुग्णालय राज्यातील आदर्श रुग्णालय बनविण्याच्यादृष्टीने कामकाज सुरु आहे. गेल्या 16 दिवसांपासून महाविद्यालयातील विविध भागात नवनवीन बदल घडून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पूर्ण आढावा घेतल्यानंतर राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकारी व प्रशासक यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर 17 डिसेंबरपासून नॉन कोविड सुविधा जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुरू करण्यात येत असल्याचेही डॉ. रामानंद यांनी यावेळी सांगितले.
वाहन पार्किंग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमधील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांच्यासह रुग्णालयात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणारे नागरिक व रुग्णांचे नातेवाईक यांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न सुटला असून मुख्य गेट क्रमांक २ मधून सर्व चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे वाहन पार्किंगकरिता शिस्त लागली असून याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक यंत्रणा देखील उभारली गेली आहे.
स्वच्छता : रुग्णालयाच्या व महाविद्यालयाच्या आवारात स्वच्छता रहावी यासाठी काटेकोर धोरण ठेवून सर्व ठिकाणी साफसफाई करण्यात आली आहे. तसेच महत्वाच्या पॉईंटवर कचरापेट्या ठेवल्या आहे. परिसर अस्वच्छ करण्याऱ्यांना प्रतिबंध केला जात असून प्रत्येकाला वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती देण्यात येत आहे.
परिसर सुशोभीकरण : परिसरात सुशोभीकरणाला मोठे महत्व दिले जात असून मुख्य गेटच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर ऐतिहासिक निर्जंतुकीकरण मशीन लक्ष वेधून घेत आहे. तसेच परिसरातील विविध प्रकारची झाडांना विशिष्ट सजावट करून परिसर आकर्षक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भिंतीवर रंगकाम करून विविध प्रकारची भित्तिचित्रे काढून परिसर प्रसन्न करण्याचे काम हाती घेतले आहे.
रस्ते : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे दोन्ही प्रवेशद्वाराकडील रस्ते नव्याने दुरुस्त करण्यात आले आहे. तर मुख्य महाविद्यालयाकडे जाणारे रस्ते डांबरीकरण करून उत्तम झाले आहेत. त्यामुळे परिसरात ये-जा करण्यास सुलभता होत आहे.
भंगार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात काही ठिकाणी अनावश्यक भंगार साहित्य पडून होते. त्याचा निपटारा करीत त्या जागा वैद्यकीय सेवेसाठी उपयोगात आणण्यात येत आहेत.
वैद्यकीय सुविधा : वैद्यकीय कर्मचारी वर्ग पुरेसा आहे. औषधींची कमतरता नाही. गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिजन टॅंकची उभारणी करण्यात आली आहे.
मर्यादित वाहनांना प्रवेश : येथील मुख्य गेट क्र. १ मधून फक्त रुग्णवाहिका, शववाहिका, पोलिसांचे वाहन, कचरा भरणारे वाहन यांनाच आतमध्ये सोडण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच दुचाकी, रिक्षा किंवा खाजगी चारचाकीतुन रुग्ण उपचारास आणला असेल तर अशाच वाहनांना आत सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ओपीडीची सुलभ व्यवस्था : रुग्णांना वैद्यकीय सेवा तातडीने मिळावी, त्याचा वेळ वाचला पाहिजे यादृष्टीने मुख्य गेटच्या आवारातील वाहन पार्किंग काढून तेथे केसपेपर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे महिला, पुरुष, दिव्यांग यांच्यासाठी ४ टेबल राहतील. रुग्णाचा केसपेपर निघाला कि त्याच्या समोरील बाजूस वैद्यकीय सेवेसाठी तो आत जाईल. त्याला आवश्यक सेवा मिळाली कि तो लवकर घरी गेला पाहिजे अशा प्रकारचे व्यवस्थित नियोजन याठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका, कक्षसेवक, कर्मचाऱ्यांचे करण्यात आले आहे.
संपर्कांसाठी यंत्रणा : रुग्णालयात सकाळी ९ ते १ वैद्यकीय सेवा राहील. केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ८. ३० ते १२.३० राहील. रुग्णांना संपर्कासाठी केसपेपरच्या बाजूला जनसंपर्क कक्ष उभारण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना आहे. हि सुविधा मुख्य गेट क्र. १ च्या आवारातच करण्यात आली असून त्यासाठी रुग्णांनी रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणणे गरजेचे असल्याचेही डॉ. रामानंद यांनी यावेळी सांगितले.