मोहन सारस्वत, लोकमत न्यूज नेटवर्क, जामनेर (जि. जळगाव): वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने धारदार शस्त्राने वडिलांच्या गळ्यावर वार करुन त्यांना ठार मारले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना गुरुवारी दुपारी पळासखेडे बुद्रुक ता.जामनेर येथे घडली. बाजीराव राजाराम पवार (५५) असे मृत इसमाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी घरात कुणीही नव्हते. त्यावेळी मुलगा सुमित बाजीराव पवार (२६) याने वडिलांकडे पैसे मागितले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि सुमित याने रागाच्या भरात वडीलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.
ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत पवार यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. निलेश सुनिल गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दीपक रोटे तपास करीत आहेत.