जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने, जिल्हा रुग्णालयात १७ डिसेंबरपासून नॉनकोविड रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच रुग्णालयात ३०० खाटा या नॉनकोविड रुग्णासांठी, तर १२५ खाटा या कोविड रुग्णासांठी राखीव ठेवण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करून, सोयीसुविधांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रशासक डॉ. बी. एन. पाटील, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक वैभव सोनार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सी. एस.चव्हाण उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे, मे महिन्यात जिल्हा रुग्णालयाचे पूर्णपणे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले होते. तर सिव्हिलमधील सर्व प्रकारच्या नॉनकोविड रुग्णांवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आता सात महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूर्वीप्रमाणे नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुविधा मिळऱ्याबाबत आरोग्य विभागाचे नियोजन होते. यासाठी राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सूचनेनुसार कोविड व नॉनकोविड रुग्णासांठी स्वतंत्र सुविधा व इतर यंत्रणा अद्ययावत ठेवून त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी व प्रशासक यांनी मंजुरी दिल्यानंतर अभिजित राऊत यांनी स्वत: बुधवारी सकाळी १० वाजता रुग्णालयाची पाहणी करून, १७ डिसेंबरपासून जिल्हा रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवरही उपचार केले जाणार असल्याचे जाहीर केले.
इन्फो :
जिल्हाधिकाऱ्यांनी केली अर्धा तास पाहणी :
जिल्हा रुग्णालयात गुरुवारपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे नॉनकोविड रुग्णांवर उपचार मिळणार असल्याने, तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी अर्धा तास या रुग्णालयाची पाहणी केली. पाहणीवेळी प्रशासक डॉ. बी. एन पाटीलही उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेत्रकक्ष, सी १ व सी २ इमारतीमधील कक्षातील उपलब्ध खाटा, तेथील सुविधा, ऑक्सिजन प्लान्ट, कोविड कक्ष तसेच रुग्णालय परिसरातील पार्किंग, रस्ते, निर्जंतुकीकरण मशीन आदी बाबींची पाहणी केली.
इन्फो :
आजपासून नॉनकोविड रुग्णांना अशी मिळेल सुविधा
मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच केसपेपर काढण्यासाठी ४ टेबल ठेवण्यात येणार आहे. यात पुरुष व महिलासांठी स्वतंत्र टेबल असेल. आरोग्य कर्मचारी सकाळी ८. ३० पासून सेवा देण्यास सज्ज राहणार असून, रुग्णांचा केसपेपर निघाला की, तेथून समोरील बाजूस वैद्यकीय उपचारासाठी रुग्णाला पाठविले जाईल. तेथून औषधी घेऊन संबंधित रुग्ण पुढील दाराने मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊन बाहेर पडेल. केसपेपर काढण्याची वेळ सकाळी ८. ३० ते दुपारी १२. ३० अशी राहणार आहे. वैद्यकीय सेवा दुपारी १ वाजेपर्यंत राहणार आहे. रुग्णांना संपर्कासाठी केसपेपरच्याच बाजूला जनसंपर्क कक्ष उभारण्यात आला आहे. दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्याच्या लाभासाठी रुग्णांनी रेशनकार्ड व आधारकार्ड सोबत आणण्याचे आवाहन यावेळी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केले आहे.
इन्फो:
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार
पत्रकार परिषदेवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या लसीबाबत माहिती देताना सांगितले की, शासनाकडून अद्याप कुठलीही माहिती आलेली नाही. मात्र, लस प्राप्त झाल्यास शासनाच्या सूचनेनुसार सुरुवातीला जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. आतापर्यंत १५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती प्राप्त झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या ६५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनासंबंधित विविध साधनसामग्री व रुग्णालयाच्या उभारणीसाठी जिल्हा नियोजनामधून ६५ कोटींचा खर्च झाला आहे. सीएसआर फंड व विविध सामाजिक संस्थांकडून मिळालेल्या निधीतून सुमारे १०० कोटींपर्यंत खर्च झाला असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गुलाबराव देवकर विद्यालयातील अपघात कक्ष गुरुवारपासून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.