कोरोना परिणाम : गाड्या सुरू असल्या तरी विक्रेते व व्यवसायिकांचे अर्थचक्र बिघडलेलेच
जळगाव : कोरोनापूर्वी दिवसभरात ३०० ते ४०० रुपये
रोजंदारीही आरामात यायची. स्टेशनवरील सर्व विक्रेते, हमाल बांधव व कॅन्टीन चालकांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळायचे. मात्र, कोरोनामुळे याचा येथील विक्रेते, हमाल बांधव व कॅन्टीन व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सध्या रेल्वेगाड्या सुरू असल्या तरी दिवसभरात ३०० ते ४०० रोजंदारीही सुटत नसून, १५० ते २०० रुपयांवर रोजंदारी आली असल्याची खंत जळगाव रेल्वे स्टेशनवरील विक्रेते, हमाल बांधव व व्यावसायिकांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.
कोरोनामुळे गेल्या वर्षी सहा महिने रेल्वे सेवा ठप्प होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी दिवाळीनंतर टप्प्या-टप्प्याने ही सेवा सुरू झाली. सध्या स्थतीला आता लांब पल्ल्याच्या बहुतांश रेल्वेगाड्या सुरू आहेत. गाड्या सुरू झाल्यामुळे या गाड्यांवर अवलंबून असलेले हमाल बांधव, विविध प्रकारचे विक्रेते, कॅन्टीन व पुस्तकांचे स्टॉल पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र, असे असले तरी कोरोनापूर्वी व्यवसायाला जो प्रतिसाद होता. तो प्रतिसाद आता राहिला नसल्याचे येथील व्यावसायिकांनी सांगितले. कोरोनामुळे प्रवासी बाहेरचे खाणे-पिणे टाळत असल्यामुळे, साहजिकच वडापाव, समोसा, कचोरी या व्यावसायिकांच्या धंद्यावर मोठा परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
हमाल बांधव म्हणतात, दिवसाला फक्त १०० ते १५० रुपयेच मिळतात..
जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने नियुक्त केलेले अधिकृत २२ हमाल बांधव आहेत. यातील काही हमाल बांधव दिवसाला स्टेशनवर थांबतात तर काही रात्री थांबतात. रेल्वे प्रशासनाने ठरविलेल्या नियमानुसार लहान व मोठे ओझे पाहून हमाली घेत असल्याचे संजय गवळी, सादिक खाटीक व इतर हमाल बांधवांनी सांगितले. कोरोनापूर्वी रेल्वेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत असल्याने दिवसभरात ३०० ते ४०० रुपये मिळायचे. मात्र, कोरोनामुळे आता बहुतांश प्रवासी हमाल बांधवांमार्फत सामानाची वाहतूक न करता स्वतः नेतात. तसेच स्टेशनवर सरकते जिने, लिफ्ट व रॅम्प झाल्यामुळे अनेक प्रवासी हमाल बांधवांची मदत न घेता स्वतः सामान नेतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा हमाल बांधवांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला असून, दिवसाला १०० ते १५० रोजंदारी मिळत असल्याचे सांगितले. तर कधी कधी तेवढे पैसेही मिळत नसल्याचे या हमाल बांधवांनी सांगितले.
इन्फो :
तर पॅसेंजर बंदमुळे अधिकच नुकसान
स्टेशनवरील चहा व विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सांगितले की, वर्षभरापासून भुसावळ विभागातून विविध ठिकाणी धावणाऱ्या १६ पसेंजर बंद आहेत. या गाड्या सुरू असताना ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक प्रवासात खाद्यपदार्थ खरेदी करतात. त्यामुळे खाद्यपदार्थ, चहा विक्रेते व कॅन्टीन चालकांचाही बऱ्यापैकी व्यवसाय व्हायचा. मात्र, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने निम्मा व्यवसाय बुडत आहे. पॅसेंजर बंदमुळे अधिकच नुकसान मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याने, रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसनंतर आता पॅसेंजर गाड्याही सुरू करण्याची मागणी या व्यावसायिकांमधून होत आहे.
इन्फो :
स्टेशनवर सध्या पाच कॅन्टीन व ४० विक्रेते
जळगाव रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थांचे पाच
कॅन्टीन असून व ४० विक्रेते या सर्व ठिकाणी कामाला आहेत. साधारण एका कॅन्टीनवर सात ते आठ कामगार असून, प्रत्येक कामगार त्याच्या सोयीनुसार स्टेशनवर व्यवसाय करतो. यात
हे कामगार कॅन्टीनवरील चहा, कचोरी, समोसा, पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट व इतर तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. जो कामगार जास्त पदार्थ विक्री करेल त्याला त्यानुसार कमिशन दिले जात असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
इन्फो :
कोरोनाच्या पूर्वी दिवसभरात कधी ३०० तर कधी ४०० रुपये रोज पडायचा.मात्र, आता कोरोनामुळे व्यवसाय कमी झाला आहे. सध्या फार फार तर २०० ते २५० रुपये रोज पडत आहे. त्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे.
गणेश पाटील, चहा विक्रेता
मी गेल्या अनेक वर्षापासून गाडीत विविध खाद्यपदार्थ विक्री करतो. कोरोनापूर्वी दिवसाला सहजच ५०० रुपये रोजंदारी सुटायची. मात्र,आता कोरोनामुळे बहुतांश नागरिक बाहेरील पदार्थ खाण्यास टाळत असल्याने व त्यात पॅसेंजर बंद असल्याने निम्यावर व्यवसाय आला आहे.
रोहित आमले, खाद्यपदार्थ विक्रेता
सध्या रेल्वेगाड्या सुरू असल्या तरी पूर्वीसारखा व्यवसाय नाही. कोरोनापूर्वी जो व्यवसाय होत होता तो आता नाही. दिवसभरात सर्व खर्च वगैरे काढून २०० ते ३०० रुपये रोज पडत आहे.
विनोद जैन, व्यावसायिक