भुसावळ : आठवणींचा सूर्य मावळू न देणे हे संस्कारांचे खरे फलित आहे. माय-बापाच्या घामाचं मोल ज्याला कळले तो आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची वाटणी करणार नाही. आई-बाप गेल्यावर जग आपले नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येकाने ते हृदयात कोरून ठेवायला हवे, असा संदेश पुण्याचे ‘गदिमा’ पुरस्कारप्राप्त कवी देवा झिंजाड यांनी दिला. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनच्या ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेत रविवारी प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.
माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या या ऑनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प कवी झिंजाड यांनी रविवारी गुंफले. त्यानंतर स्वरचित आठ ते दहा कविता व त्यांचा आशय संक्षिप्त स्वरूपात उलगडून सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक बापू मांडळकर होते. प्रास्ताविक उमेश नेमाडे यांनी केले. स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. तंत्रसाहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डॉ. जगदीश पाटील व काटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गिरीश कोळी यांचे लाभले.
आज द्वितीय पुष्प चंदनशिवे गुंफणार
द्वारकाई व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प मंगळवार, २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील दंगलकार नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.