सुशील देवकर
निवडणुका तोंडावर येतच भाजपाने विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. त्यातच शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. मात्र अद्याप या कामात अनेक अडथळे बाकी आहेत. रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वेने पाडून कामाला सुरूवात करायला हवी होती. मात्र रेल्वेचे काम मेगाब्लॉकसाठी अडले आहे. त्यातच पुलाच्या जोडरस्त्याचे काम सुरू करावयाचे तर रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच नागरिकांनी या कामाला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या विषयाला फाटे फुटण्यापूर्वीच सर्व पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता सोमवारी, उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होत आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरीही केवळ भूमिपूजन करून श्रेय घेण्याचे काम होऊ नये. तर काम तातडीने सुरू होऊन ठरलेल्या कालावधीतच पूर्णही व्हावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणांना पालकमंत्र्यांनी सूचना देण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या कामास प्रत्यक्ष सुरूवात होणे आवश्यक आहे. कारण कार्यादेश दिलेले असले तरीही जर प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नसेल तर आदर्श आचारसंहितेनुसार मक्तेदाराला कामाला सुरूवात करता येणार नाही. त्यामुळे भूमीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून काम प्रत्यक्षात सुरू होणे आवश्यक आहे. तरच हे काम मार्गी लागू शकेल. अन्यथा त्यात सातत्याने फाटे फुटण्याचीच अधिक शक्यता आहे. समांतर रस्त्यांच्या विषयात जे झाले तेच या विषयात होऊ नये, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.