आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.८ : तालुक्यातील मोंढाळा येथील मयूर डोळसे याचा कोळसेवाडी येथे झालेला खून हा खंडणीसाठी नव्हे तर किडनीसाठी झाला असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
डोळसे आयटीआय झाल्यानंतर रेल्वेच्या प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी कल्याण येथे गेला. तो कोळसेवाडीत विवेक पाटील यांच्यासोबत खोली भाड्याने घेऊन राहत होता. ८ नोव्हेंबर रोजी त्याला त्याच्या गावातील रहिवासी व मुंबई येथेच उद्योग व्यवसायासाठी गेलेले संशयित आरोपी गोकूळ रतन परदेशी, प्रमोद मदन परदेशी यांनी जेवणासाठी बोलविले व त्याला गुंगीचे औषध देऊन गळा दाबून खून केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्या वेळी त्यांनी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी खून केल्याचे कबुली जबाबात नमूद करण्यात आले आहे. हा खून खंडणीसाठी नसून किडनीसाठी असल्याचा आरोप नातेवाइकांचा आहे. परदेशी यास त्याच काळात एका अहिरराव या व्यक्तीची ५० लाखात किडनी विकत आहे, मला पैसे मिळाले आहे, तुला पण ५० लाख रुपये मिळतील अशा स्वरूपाची सौदी अरब जाहिरात आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे हा प्रकार किडनी रॅकेटचा असून याची पाळेमुळे परदेशात असू शकतात, असा संशय निर्माण केला जात आहे. याची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, मयूर डोळसे याच्या नातेवाइकांनी दिलेले निवेदन व घेतलेला संशय याप्रमाणे तपास सुरू आहे, अशी माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीळकंठ पाटील यांनी दूरध्वनीवरून दिली. नातेवाइकांचे निवेदन विचारात घेण्यात आले आहे. मात्र तपास सुरू असल्यामुळे माहिती देता येत नाही, असे त्यांनी सांगितले.