लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तापी पाटबंधारे विभागातील माजी कर्मचारी नारायण अंबादास व्हिरोळकर आणि त्यांच्या पत्नी पुष्पा यांचा २४ तासांच्या आत मृत्यू झाला. बुधवारी पुष्पा व्हिरोळकर यांचा सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी ६ वाजता नारायण व्हिरोळकर यांनीही अखेरचा श्वास घेतला. साडेचार दशकांपेक्षा जास्त काळ ज्या घरात एकत्र संसार केला, त्याच घरात जाऊन कदाचित पत्नीवियोग सहन करण्यापेक्षा तिच्यासोबतच नारायण व्हिरोळकर यांनीही आपला अखेरचा श्वास घेतला.
व्हिरोळकर दाम्पत्य कोरोनाबाधित होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच अचानक हृदयविकाराचा धक्क्याने पुष्पा व्हिरोळकर यांनी बुधवारी १४ रोजी सकाळी ६ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे जवळपासचे सर्व नातेवाईक, पुतणे हे जळगावला आले. या सर्वांनी नारायण व्हिरोळकर यांची भेटदेखील घेतली. मात्र, कुणीही त्यांना पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली नाही. पण, सर्वांच्या चेहऱ्यावरील दु:ख त्यांना दिसले असावे. तसेच पत्नीच्या मृत्यूचीदेखील जाणीव झाली असावी.
वर्षानुवर्षे ज्या घरात पत्नीसोबत राहिले, त्याच उंबरठ्यात तिच्याशिवाय कसे उभे राहायचे, याची कदाचित त्यांना जाणीव झालेली असावी. त्यामुळे त्यांनीही आपली इहलोकीची यात्रा संपवून परलोकी जाण्याचे ठरवले असावे.
पत्नीचा मृत्यू सकाळी ६ च्या सुमारासच झाला. त्यांनीही आपला अखेरचा श्वास सकाळी ६ च्या सुमारास घेतला. व्हिरोळकर दाम्पत्याला मूल नव्हते. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार जळगावातील नातेवाईक आणि त्यांच्या पुतण्यांनीच केले.
कोरोना झाला काळ, पण साथ तोडू शकला नाही
व्हिरोळकर दाम्पत्य हे कोरोनाबाधित होते. त्यातच त्यांची अखेर झाली. त्यांच्यासाठी कोरोना जरी काळ बनून आला असला, तरी सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतलेल्या या वृद्ध जोडप्याची एकमेकांची साथ कोरोनादेखील तोडू शकला नाही. त्या दोघांनीही सात वचनांसोबतच आपला अखेरचा श्वासदेखील एकत्रच घेतला.