विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : गुजरातमधील जुनागड येथून महाराष्ट्राच्या आपल्याजवळील चिखलगाव या १२०० कि.मी. अंतर पायी पार पाडत मजूर कुटुंबाने अनेक अनुभवांना सामोरे जात अनंत अडचणींनादेखील अनुभवण्याची व्यथा मुक्ताईनगर येथे पायी पोहोचल्यानंतर ‘लोकमत’समोर मांडली. विशेष म्हणजे यात १० वर्षांच्या चौथीत शिकणाºया लहान मुलीचा व ७० वर्ष वयाने वृद्ध असलेल्या माऊलीचादेखील समावेश असल्याने कुटुंबाकडे बघून हृदय हेलावल्याशिवाय राहत नाही.अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील जवळचे नातेवाईक असलेले दोन कुटुंब गुजरातमधील जुनागड येथे मजुरीसाठी गेले होते. जुनागड येथील तेल कंपनीमध्ये काम करण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब गेले होते. कुटुंबामध्ये एकूण सात जण होते. ज्यात समाधान खर्डे, शुभम ढाहाके, सुरेश डहाके, शिवाजी खर्डे, वैष्णवी खर्डे, माया खर्डे व कमलाबाई खर्डे अशा सात जणांचा समावेश आहे. ढाके व खर्डे कुटुंब हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून गेल्या काही वर्षांपासून जुनागड येथे तेल कंपनीत काम करण्यास गेले होते. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जुनागड येथे मराठी कुटुंबीयांनी अक्षरश: हातावर पोट धरून दिवस काढले. कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत संपून गेल्याने जुनागड सोडल्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र आंतरराज्य बसेस व रेल्वे बंद असल्याने जावे कसे? या विवंचनेत हे कुटुंब पडलेले होते. फॅक्टरीमालकानेही कामावरून कमी केल्याने व कंत्राटी मजूर असल्याने कोणाचाही हातभार उपजीविका चालविण्यासाठी नसल्याने शेवटी डहाके व खर्डे कुटुंबीयांना जुनागड सोडल्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही? शेवटी ६ मे रोजी तब्बल महिनाभर लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी जुनागड सोडले. कोणतेही वाहन नसल्याने अत्यावश्यक साहित्य घेऊन भाड्याचं घर सोडले. विशेष म्हणजे भाड्याच्या घरातदेखील बºयापैकी साहित्याची जुळवाजुळव जीवन जगण्यासाठी डहाके व उखर्डे कुटुंबीयांनी केलेली होती. शेवटी ते साहित्य तसेच सोडून त्यांना पाठीवर व डोक्यावर सामान घेता येईल ते घेऊन निघाले. बाराशे किलोमीटरचे अंतर कापायचे कसे? ही विवंचना असली तरी ‘गावाची ओढ व मरण गावात आले तर बेहत्तर’, याच एका हेतूने प्रेरित होऊन मराठी कुटुंबीय पायीच जुनागडहून अकोल्याकडे निघाले. या प्रवासाच्या दरम्यान बडोदा जवळ एका पोलीस कर्मचाºयाने त्यांना काही अंतरासाठी एका वाहनातदेखील बसवून भूतदया नक्कीच दाखवली. मात्र इतर ठिकाणी रस्त्यामध्ये कुठेही त्यानंतर वाहन न मिळाल्याने तेवढे ५० ते ६० कि.मी. वगळता पूर्ण अंतर मुक्ताईनगरपर्यंत म्हणजे जवळपास एक हजार ५० किलोमीटर अंतर या कुटुंबीयाने पायी कापले.या कुटुंबांमध्ये कमलाबाई खर्डे या ७० वर्षाच्या आजीबाई तर वैष्णवी खर्डे ही १० वर्षांची चिमुकली मुलगी आहे. वैष्णवी ही चौथीत शिकत असून लॉकडाऊन पूर्वीच काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांसमवेत जुनागडला पोहोचलेली होती. कमलाबाई या वार्धक्याकडे तर वैष्णवी ही जीवन जगण्याचं नवीन आशा डोळ्यासमोर घेऊन जुनागडकडे गेल्या असल्या तरी त्यांनाही १२०० कि.मी. पायी कापण्याशिवाय गत्यंतर नव्हते.रस्त्यात ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या हद्दीत भोजनाची व्यवस्था होत असल्याने भोजनाबद्दल व चहा पाण्याबद्दल कोणतीही तक्रार त्यांनी केली नाही. मात्र कोणतेही वाहन या कुटुंबीयांना बसवून घेण्यास तयार नसल्याने अक्षरश: पायपीट त्यांना करावी लागत आहे. भुसावळ येथून सकाळी चार वाजता हे कुटुंबीय पायी निघाल्यानंतर मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवर दुपारी अकरा साडेअकराला पोहोचले.परक्या राज्यात उपासमारीने मरण्यापेक्षा पाई चालत स्वत:च्या गावाला जाऊन मरणे कधीही सोयीस्कर आहे.-समाधान खर्डे, कुटुंब प्रमुख, रा.चिखलगाव, जि.अमरावती