जळगाव : महावितरणतर्फे गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव परिमंडळातील सर्व लहान-मोठ्या थकबाकीदारांना विजबिल भरण्याबाबत नोटीसा पाठविण्यात येत असून, आता पर्यंत खान्देशातील ४ लाख ११ हजार थकबाकीदारांना एसएमएसद्वारे नोटीसा बजाविण्यात आल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. तर एसएमएसद्वारे ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबत पाठविलेला संदेश हा नोटीसच असल्याचेही महावितरणतर्फे सांगण्यात आले.
कोरोनामुळे महावितरणतर्फे शासनाच्या सुचनेनुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता, ग्राहकांना जुनपर्यंत सरासरी बिले देण्यात आली. मात्र, महावितरणतर्फे देण्यात आलेली सरासरी बिले ही अवाजवी असल्याचे सांगत, हजारो ग्राहकांनी बिलांबाबत महावितरणकडे तक्रारी केल्या. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे ठिकठिकाणी तक्रार निवारण शिबिरे घेऊन, अनेकांच्या तक्रारींचे निवारही करण्यात आले. मात्र, तरीदेखील नागरिकांनी बिलाचा भरणा करण्याकडे पाठ फिरविली आहे. जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हा मिळून महावितरणची तब्बल १३०० कोटींच्या वर थकबाकी झाली आहे. यामध्ये सर्वांधिक ६६० कोटींची थकबाकी एकट्या जळगाव जिल्ह्यात असून, त्या खालोखाल धुळे जिल्ह्यात ३७८ कोटींची थकबाकी तर नंदुरबार जिल्ह्यात ३०१ कोटींची थकबाकी आहे. दिवसेंदिवस थकबाकीचा आकडा वाढत असल्यामुळे, महावितरणतर्फे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक यांच्यासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या थकबाकीबाबतही नोटीसा बजावण्याला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाच्या सुचनेनुसार ग्राहकांना या नोटीसा बजाविण्यात येत असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
एसएमएसद्वारे आलेली नोटीसही ग्राह्य
महावितरणतर्फे जळगाव परिमंडळातील सर्व ग्राहकांना विजबिलांची वेळोवेळी माहिती देण्यासही थबबाकी भरण्याबाबतही एसएमएस पाठविण्यात येत आहे. हा एसएमएसही नोटीशीचाच भाग आहे. त्यामुळे ज्या थकबाकीदार ग्राहकांना अशा प्रकारे एसएमएसद्वारे बिलभरण्याबाबत नोटीसा येत आहेत, त्या ग्राहकांनी थकबाकी भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
चौकट :
खान्देशात जिल्हानिहाय बजावलेल्या नोटीसा
जळगाव - २ लाख ५३ हजार ४२३
धुळे - १ लाख १४ हजार ६६२
नंदुरबार - ४३ हजार ३७७
एकूण - ४ लाख ११ हजार ४६२