लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - इच्छादेवी चौफुली ते डी मार्ट पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई तात्काळ सुरू करावी अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या. महापौरांच्या महास्वच्छता अभियानातंर्गत शुक्रवारी मेहरुण, गणपती नगर भागात भेट दिली. यावेळी विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.
महास्वच्छता अभियानात महापौर भारती सोनवणे, यांनी शुक्रवारी प्रभात क्रमांक १६ ते १८ मध्ये पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सदाशिव ढेकळे, मनोज आहुजा, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, अमित काळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत यांच्यासह मनपातील अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. गणपती नगरात ३-३ दिवस रस्त्यांची साफसफाई नसते, परिसरातील अनेक पथदिवे बंद आहे, धोकादायक झाडे केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, काही खाजगी मोकळ्या प्लॉटवर घाण टाकण्यात येते अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. महापौरांनी संबंधित अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या. तसेच समस्या न सुटल्यास नागरिकांनी फोन करावा असेही त्यांनी सांगितले. डी मार्टच्या बाजूला तांबापुरा समोरील रस्त्यावर नागरिक शौचास बसतात अशी तक्रारी नगरसेविका यांनी केली. महापौरांनी सूचना देत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचनाही महापौरांनी दिल्या.
मुख्य रस्त्यावरील गटारीच्या कामासाठी 'नही'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा
शिरसोली मुख्य रस्त्यावर कब्रस्थान समोर असलेल्या मोठ्या गटारीचा स्लॅब काढण्यात आला असून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच गटार अरुंद झाल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते अशी तक्रार नागरीक व नगरसेवकांनी केली. शिरसोली रस्ता महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येतो अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. महापौरांनी यांनी लागलीच 'नही'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता गटारीवरील स्लॅब कल्व्हर्ट, पाईप काढून गटारीची रुंदी वाढवण्याचा सूचना दिल्या महास्वच्छता अभियानादरम्यान मनपाच्या ४३ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ३९ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.