लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रावेर तालुक्यातील ३४ गावांमध्ये दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या निविदांमध्ये अनियमितता आढळून आली असून याबाबत या गावातील सरपंच तसेच ग्रामसेवकांना सोमवारी नोटीस बजावून त्यांच्याकडून दहा दिवसात खुलासे मागविण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे स्पष्ट होणार आहे.
गौरखेडा गावातील तक्रारीनुसार पूर्ण रावेर तालुक्यातील ३५ गावांमधील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामांची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.बी.रणदिवे यांच्यासह तीन सदस्यीय समितीने चौकशी केली होती. या समितीने आपला अहवाल सादर करीत ३५ गावांमधील ७५ कामांपैकी ३४ गावांमधील ७२ कामांमधील निविदांमध्ये अनियमितता आढळून आल्याचे म्हटले होते. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात अशी शिफारसच या समितीने केली होती. तसे पत्र ही ग्रामपंचायत विभागाला दिले होते. त्यानुसार आता संबधित गावांचे सरपंच व ग्रामसेवकांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून खुलासे मागविण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.आर.लोखंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी या नोटीसा काढण्यात येणार आहे.