लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील थकबाकीदार असलेल्या गाळेधारकांना संकुल समिती लवकरच नोटीस बजावणार आहे. त्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. क्रीडा संकुलातील काही गाळेधारकांनी गेल्या अनेक वर्षांपासून दुकानाचे भाडेच दिलेले नाही. दुकानांच्या थकबाकीसंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती आणि आता लवकरच त्यांना नोटीस दिली जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीला दोन महिने उलटले तरी अजून ही कामे पूर्ण झाली नाही.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा १७ मे रोजी समितीची बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी पाहणी करून मैदानातील व बाहेरील व्यापारी गाळ्यांच्या समोर असलेल्या पार्किंगबाबत काही सूचनादेखील केल्या होत्या. पार्किंगमध्ये पेव्हर ब्लॉक तुटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी सिमेंट काँक्रीट करणे, तसेच शौचालयांमधील गळती बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याबाबत संकुल समितीने नेमलेल्या आर्किटेक्टने काही दिवसांपूर्वी पाहणी केली असून, लवकरच त्याचा अहवाल मिळेल, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुलातील पार्किंगमध्ये काँक्रिटीकरण केले जाणार आहे. गाळेधारकांच्या प्रश्नाबाबत उपसमितीची स्थापना केली आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया राबवून लवकर थकबाकीदारांना नोटीस दिली जाईल, असेही दीक्षित यांनी सांगितले.
मैदानात मात्र समस्याच समस्या
सध्या मैदानात खेळाचा फारसा सराव नाही. त्यामुळे मैदानात गवत उगवले आहे. येथे लावलेल्या सॉफ्टबॉल नेटच्या बाजूने वेली वाढत आहेत. त्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी सांगितले की, लवकरच गवत कापणीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मैदानात सध्या काही ठिकाणी चांगलेच गवत वाढले आहे. ते काढले जाईल.