भुसावळ, जि.जळगाव : शालेय पोषण आहारासंबंधी उन्हाळ्याच्या सुटीतील नियोजनासंबंधी आयोजित बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.सेन्ट अलायंस हायस्कूलमध्ये एकदिवसीय शालेय पोषण आहार या विषयावर मुख्याध्यापक सहविचार सभा घेण्यात आली. दुष्काळग्रस्त व टंचाईग्रस्त तालुका असताना महत्त्वपूर्ण बैठकीला पालिका शाळा क्रमांक २०, आनंद एज्युकेशन सोसायटी, भुसावळ, साने गुरुजी स्कूल, भुसावळ व आॅर्डनन्स फॅक्टरी प्राथमिक शाळा, वरणगाव येथील मुख्याध्यापक गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आल्या.बैैठकीत शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, भुसावळ तालुका हा दुष्काळग्रस्त असल्याने यावर्षी सुट्ट्यांमध्येदेखील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांसाठी सुरू असणार आहे. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार देण्यासाठी शाळेमध्ये बायोमेट्रिक हजेरी असणे आवश्यक असून, यासाठी शाळांनी लोकसहभागातून ही यंत्रणा लवकर बसवावी. उन्हाळ्याच्या सुट्टीत दुष्काळग्रस्त तथा टंचाईग्रस्त भागांमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासोबत आठवड्यातून तीन दिवस दूध, अंडी, फळे असा पौष्टिक आहार द्यायचा आहे. यासाठी आठवड्याला पंधरा रुपये अतिरिक्त खर्च मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा हजेरी असणे आवश्यक आहे. यासाठी शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन बायोमेट्रिक मशीन बसविण्यासाठी लोकसहभाग, ग्रामनिधी, जिल्हा निधीतून ही यंत्रणा बसवून सुट्ट्यांमध्ये शालेय पोषण आहारासोबत पौष्टिक आहार द्यावयाचा आहे. यासाठी २९ मे २०१७ च्या परिपत्रकाचे अवलोकन करून कार्यवाही करावयाची आहे. आहार योग्य पद्धतीने दिला जातो किंवा नाही यावर नियंत्रणासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेची नेमणूक करण्यात आली आहे. दररोजची हजेरी ही नोंदवही क्रमांक एकमध्ये व हजेरी पुस्तिकेत लागलीच घ्यावी.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, तुषार प्रधान, नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी डी. टी. ठाकूर यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञ, शिक्षक उपस्थित होते.
पोषण आहार बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 3:52 PM
शालेय पोषण आहारासंबंधी उन्हाळ्याच्या सुटीतील नियोजनासंबंधी आयोजित बैठकीला दांडी मारणाऱ्या चौघा मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
ठळक मुद्देपोष्टिक आहार विद्यार्थ्यांना देण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेची गरजआहार योग्य पद्धतीने दिला जातो किंवा नाही यावर नियंत्रणासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणेची नेमणूक