जळगाव : मेहरूण परिसरात वाळूसाठा करून ठेवल्याप्रकरणी मेहरूण भागातील रहिवासी बाळू नामदेव चाटे यांना तहसीलदार नामदेव पाटील यांनी नोटीस बजावली आहे. याप्रकरणी संबंधितास १६ एप्रिल रोजी आपले म्हणणे सादर करण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी हजर न राहिल्यास एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील नोटीसद्वारे दिला आहे.
मेहरुण परिसरातील बाळू नामदेव चाटे यांच्या मालकीच्या प्लॉट नंबर २०७ मध्ये ३०० ब्रास अवैधरित्या वाळूसाठा करून ठेवल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती. त्यानुसार तलाठ्यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला होता. याप्रकरणी तहसीलदार नामदेव पाटील यांनी ९ एप्रिल रोजी चाटे यांना नोटीस बजावून आवश्यक कागदपत्रे व पुराव्यासह १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी हजर न राहिल्यास आपले काही म्हणणे नाही, असे समजून एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील नोटीसद्वारे दिला आहे.