लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपाने सर्व १९ प्रभागांमधील रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा काढून मक्तेदारांना कार्यादेश देवून १५ दिवस उलटले आहे. त्यामुळे ज्या भागात अमृत ची कामे सुरु आहेत, असे भाग वगळून कामांना सुरुवात करण्याचा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या आहेत. तसेच ज्या भागात अमृतची कामे झाली आहेत. मात्र, तरीही रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केलेली नाही. अशा मक्तेदारांना नोटीसा बजावण्याचे आदेश महापौरांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
मनपाने कार्यादेश देवूनही मक्तेदारांनी कामाला सुरुवात न केल्याबाबत ‘लोकमत’ ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रकाशीत केले होते. याच वृत्ताची दखल घेत बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी मनपात मक्तेदारांची बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर चौधरी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले यांच्यासह सर्व अभियंता आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मक्तेदारांना कामाची वर्कऑर्डर देखील देण्यात आली आहे. अनेक प्रभागात अद्याप काम सुरू झालेले नसल्याने बुधवारी महापौरांनी मक्तेदार व मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच खडबोल सुनावले. तसेच अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यांची डागडुजी होत नसल्याचे समोर आले.
अमृत योजना, भूमिगत गटारींचे काम अपूर्ण
शहरात सध्या अमृत योजना आणि भूमिगत गटारींचे काम सुरू आहे. जळगावात प्रभाग क्रमांक ४, ६, १३, १४, १५, १६, १८, १९ मध्ये अपूर्ण आहे तर प्रभाग क्रमांक ४, ७, ८, ९, १३, १४, १५, १६, १८ मध्ये अमृत योजनेचे काम अद्याप कमी अधिक प्रमाणात अपूर्ण आहे. काही प्रभागात पाईपलाईन टाकणे, व्हॉल्व्ह बसविणे, नळ संयोजन देण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती अभियंत्यांनी महापौरांना दिली. प्रत्येक प्रभागात खड्डे बुजविण्यासाठी आणि रस्त्यांच्या डागडुजीकामी ५० लाखांच्या कामाची वर्कऑर्डर देऊन १५ दिवस झाले आहेत. ज्या ठिकाणी काम सुरू करता येऊ शकेल परंतु अद्यापही करण्यात आलेले नाही त्या मक्तेदारांना नोटीस बजवावी, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.