जळगाव : भुसावळ येथील पी. के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेवून लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप करणाऱ्या एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना कुलगुरूंची बदनामी केली म्हणून १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाच्या वतीने पाठविण्यात आली आहे.
एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाखो रुपये घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ. मंगला साबद्रा यांना प्राचार्य पदावरची नियुक्ती तशीच ठेवली आहे. अशा आशयाचे पत्रक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धसाठी दिले होते. त्यामध्ये या प्रकरणात कुलगुरूंशी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोपही केला होता. समाज माध्यमांमध्येही तशी क्लिप त्यांनी प्रसारीत केली होती. या बातमीमुळे विद्यापीठाची बदनामी केली म्हणून विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार यांच्या स्वाक्षरीने देवेंद्र मराठे यांना ॲड. सुशील अत्रे व ॲड. निशांत अत्रे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. विद्यापीठाची बदनामी केली म्हणून मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, तसेच १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई अदा करावी अन्यथा त्यांच्याविरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.