अमळनेर : महसूल बुडविल्याने, महसूल विभागाने पाडळसे प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत ६७ लाख ५२ हजार रुपये भरण्याचे बजावले आहे. पैसे न भरल्यास सक्तीची वसुलीची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस तहसीलदार प्रदीप पाटील यांनी बजावली आहे.निम्न तापी प्रकल्प पाडळसेचा ठेका श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला (हैदराबाद) देण्यात आलेला आहे. २००३ साली धरणाची नदीपात्राबाहेरील भिंत बांधण्यासाठी परिसरातील शेतांमधील माती वापरली होती. मात्र त्याचा महसूल बुडवल्याने महसूल विभागातर्फे त्याला ६७ लाख ५२ हजार ४८९ रुपयांच्या गौण खनिज कर व दंडाची नोटीस देण्यात आली होती. त्याविरोधात श्रीनिवास कन्स्ट्रक्शनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना १० लाख रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश दिले होते. परंतु श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालकाने रक्कम भरली नाही. त्यामुळे ‘तुम्ही ६७ लाख ५२ हजार ४८९ रुपये भरण्यास पात्र आहेत आणि नोटीस बजावल्याच्या दिनांकापासून तीन दिवसांच्या आत दंडाची रक्कम व नोटीस फी भरली नाही तर त्याच्या अनुपालनात कसूर झाल्याबद्दल आपल्याविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये उक्त थकबाकीच्या एक चतुर्थांशापेक्षा अधिक नसेल इतकी अतिरिक्त रक्कम वसूल करण्यात येईल, अशी नोटीस २० रोजी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला दिली आहे. (वार्ताहर)
पाडळसे प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस
By admin | Published: March 22, 2017 12:37 AM