लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दापोरा शिवारातील गट क्रमांक २५२/२ मध्ये मातीमिश्रीत वाळूसाठा केल्याप्रकरणी मंडल अधिकारी पिंप्राळा आणि तलाठी मोहाडी यांनी अहवाल सादर केला आहे. हा ६२८.६९ ब्रास वाळूसाठा कोणतीही परवानगी न घेता केला असल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत कारवाई का करू नये, याबाबत नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याची नोटीस तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे. ही नोटीस २ जुलै रोजी देण्यात आली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. याबाबत सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या वाळूसाठ्याची मोजणी केली आहे. त्यानुसार हा वाळूसाठा ६२८.६९ ब्रास आहे. ही वाळू मातीमिश्रीत असल्याचेही नंतर समोर आले होते. या प्रकरणात आता तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. तसेच सात दिवसांच्या आत म्हणणे सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.