जळगाव : अधिग्रहीत केलेल्या जमिनींची तडजोडीअंती ठरलेली रक्कम पंधरा दिवसात न भरल्यामुळे ‘तडजोडीचा अवमान’ केल्याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला शेतक-यांनी वकिलामार्फत नोटीस पाठविली आहे. दरम्यान, रक्कम त्वरित न्यायालयात न जमा केल्यास विद्यापीठ विरूध्द अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असाही इशारा शेतक-यांनी नोटीसमधून दिला आहे.
१९९७ साली विद्यापीठासाठी बांभोरी येथील शेतक-यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या होत्या. अधिग्रहीत केलेल्या जमिनीची रक्कम मिळावी यासाठी शेतक-यांनी धाव घेतली होती. त्यामुळे तडजोडीसाठी न्यायालयात खटला सुरू होता. अखेर मार्च महिन्यात तडजोडीअंती १५ लाख २३ हजार ५१ रूपये रक्कम न्यायालयात भरणे ठरली. तसेच ही रक्कम पंधरा दिवसात भरणे आवश्यक होते. मात्र, ती रक्कम आठ महिने उलटून सुध्दा भरण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाने तडजोडीचा अवमान केला, असल्याची नोटीस ही शेतक-यांनी अॅड. नारायण लाठी व अॅड. कुणाल पवार यांच्या मार्फत विद्यापीठाला पाठविली आहे. रक्कम त्वरित न्यायालयात न जमा केल्यास विद्यापीठाविरूध्द अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असाही इशारा नोटीसेतून देण्यात आला आहे. ही नोटीस काही दिवसांपूर्वी विद्यापीठाला देण्यात आली असल्याची माहिती अॅड. कुणाल पवार यांनी दिली.
चौकट
स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्वच्छतेच्या साधनानांवर लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविले जातात मात्र प्रत्यक्षात स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. लाखोंचे ठेके देऊन कामे होत नसल्याने यात आर्थिक घोटाळा आहे. अधिका-यांच्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ॲड. कुणाल पवार व भूषण भदाणे केला आहे.